थोरात कारखान्याने उभारला 750 कि. वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प | पुढारी

थोरात कारखान्याने उभारला 750 कि. वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  आधुनिक विकासाचे एक पाऊल पुढे टाकत सक्षमपणे प्रगतीच्या दिशेने उंच भरारी घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने छतावर सौर ऊर्जा सहवीज निर्मिती प्रकल्प (रूफ टॉप) बसवून 750 किलोवॅट वीज निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प उभारला आहे. याद्वारे प्रत्यक्ष सह वीज निर्मिती सुरू केली असून, सहकार क्षेत्रात हा वीज निर्मिती प्रकल्प दीपस्तंभ ठरणार आहे. थोरात कारखान्याने छतावर सह वीज सौर ऊर्जा सिस्टीमद्वारे 750 किलो वॅट सौर ऊर्जा सह वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

संबंधित बातम्या : 

स्वातंत्र्य सेनानी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या कडव्या शिस्तीने काटकसर व पारदर्शी कारभारामुळे या साखर कारखान्याची यशस्वी घोडदौड आजही सुरू आहे. सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार कारखान्याचे हिताचे निर्णय घेवून राज्यात वेगळा ठसा उमटवला. यामुळे अनेक पुरस्कार कारखान्याला मिळाले. माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, मात्र नुसत्या साखर निर्मितीवर अवलंबून न राहता काळानुरूप बदल घडवत इतर प्रकल्पांद्वारे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी थोरात कारखान्याने यापुर्वी उभारलेल्या 5500 मे. टन क्षमता व 30 मेगावॅट सह वीज निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहे.

आता राज्यात पहिला सौर ऊर्जा सहवीज निर्मिती प्रकल्प अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला. प्रकल्प उभारणीसह चाचणी पुर्ण होऊन प्रत्यक्षात गेल्या 42 तासांमध्ये 3600 युनिट वीज निर्मिती झाली. या सौर ऊर्जा सिस्टीममधून 1 तासात 750 युनिट वीज तयार होणार आहे. यातून दिवसाच्या 12 तासांमध्ये 9000 युनिट वीज तयार होणार आहे. कारखान्याच्या ऑफ सीजन काळात ही वीज ऊर्जा महामंडळाला विकली जाणार आहे. या प्रकल्प उभारणीचा खर्च 2 कोटी 90 लाख रुपये आहे, परंतु हा खर्च अवघ्या अडीच ते तीन वर्षांत वसूल होणार आहे.

या प्रकल्प सहकारात राज्याला मार्गदर्शक ठरला आहे. थोरात साखर कारखान्याने उभारलेल्या सौर ऊर्जा सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्य. संचालक जगन्नाथ घुगरकरसह संचालक मंडळाने कारखान्याच्या हिताचे निर्णय घेतले. दरम्यान, सौर ऊर्जा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारुन प्रगतीच्या दिशेने गगनभरारी घेतल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

थोरात साखर कारखान्याचा झाला पुण्यात गौरव!
पुणे येथे झालेल्या को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतात सहकारातून वीज निर्मितीचे काम करणार्‍या कारखान्यांचा गौरव ज्येष्ठ नेते खा. शरद पवार व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. थोरात कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे व कार्य. संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी स्वीकारला.

थोरात साखर कारखान्याचा सौर ऊर्जा प्रकल्प-750- प्रकार रुफ टॉप ग्रीड कनेक्टेड नेट मिटरींग अंतर्गत आहे.
प्रती पॅनेल वीज निर्मिती क्षमता – 545 वॅट, एकुण पॅनेल 1392 नग उभारणी.
अपेक्षित प्रती दिवस वीज निर्मिती – 3000 युनिट.
प्रती माह वीज निर्मिती -90 हजार युनिट.

Back to top button