बिबट्याकडून वासरू अन् कुत्र्याचा फडशा !

बिबट्याकडून वासरू अन् कुत्र्याचा फडशा !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे शनिवारी (दि.16) पहाटे बिबट्याने वासराची शिकार केली. तसेच, एका कुत्र्याचीही शिकार केली आहे. वाकीवस्ती परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बहिरवाडी परिसरातील वाकीवस्तीत गेल्या आठवड्यात वेळोवेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले. दीपक दारकुंडे यांनी बिबट्या पाहिल्यानंतर ग्रामस्थांना माहिती दिली होती. मादी बिबट्या व त्याची दोन पिल्ले असल्याचे नागरिकांनी सांगितले. शनिवारी सुशील माधवराव मगर यांच्या वासराची शिकार करण्यात आली.

संबंधित बातम्या :

वन विभागाचे वनपाल शरमाळे, वनरक्षक रणसिंग यांनी मृत वासराचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी वासराचे शवविच्छेदन केले. वन विभागाकडून परिसरात बिबट्याचा वावर असून, वासराची शिकार ही बिबट्याकडूनच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाकीवस्ती येथील काटवण इनाम परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत आहे. बहिरवाडी येथील पै. जगन्नाथ दारकुंडे यांच्या कुत्र्याची शिकारही बिबट्याने केली आहे. बहिरवाडी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी शिवाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य राजू दारकुंडे, बहिरू दारकुंडे, संजय येवले, गणेश दारकुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले.

बहिरवाडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी आपली व लहान मुलांची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावित. बिबट्या दिसल्यास त्याची छेड न काढता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
                                                          – अंजना येवले, सरपंच, बहिरवाडी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news