नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची मुदत 6 जून 2024 संपत आहे. त्यामुळे एप्रिल-मे या महिन्यांत लोकसभेची निवडणूक अपेक्षित आहे. मात्र, भारत निवडणूक आयोगाने यापूर्वी जरी निवडणूक घेतली तरीही निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. 1967 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका झालेल्या आहेत. यंदा असा निर्णय घेतला गेल्यास निवडणूक प्रक्रिया राबविण्यास निवडणूक यंत्रणा सक्षम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे शुक्रवारी जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या :
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात विशेष संक्षिप्त मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांच्या घरोघरी जाऊन बीएलओंनी मतदारयादीची तपासणी केली. राज्यात 9 कोटी 7 लाखांवर मतदार आहेत. आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 18 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. या तपासणीत सात लाखांवर मतदार स्थलांतरित झाले, तर दहा लाखांवर मतदार मयत झाल्याचे आढळून आले. याशिवाय राज्यभरात 58 हजार दुबार मतदार आहेत. या सर्वांची वगळणीची प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण सुरू आहे. एका मतदान केंद्रावर दीड हजार मतदार असणार आहेत.
त्यापेक्षा अधिक मतदार असल्यास नवीन मतदान केंद्र निर्माण केले जाणार असून, 25 सप्टेंबरपर्यंत नवीन मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नवीन मतदार नोंदणी, वगळणी आदी कार्यक्रम राबविला जाणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रांची छाननी केली जात आहे. मतदान ओळखपत्र हाच अधिकृत नागरिकत्वाचा पुरावा आहे. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
2019 मधील एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान झाले होते.
यंदादेखील एप्रिल महिन्यांत निवडणूक होणार असल्याचे ग्रहीत धरून निवडणूक यंत्रणेची तयारी सुरू आहे. त्यासाठी मतदान यंत्रांची (ईव्हीएम) प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदान यंत्रेदेखील सुस्थितीत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावर आवश्यक असलेली मंडप, स्टेशनरी, फर्निचर व इतर साहित्याबाबतची जुळवाजुळव डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एप्रिल महिन्यापूर्वी निवडणुका जाहीर झाल्या तरी त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
39 हजार 250 मतदारांची वगळणी
जिल्ह्यात बीएलओंच्या मार्फत 97 टक्के मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत 28 हजार 214 मतदार मयत तर 11 हजार 36 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित आढळून आले. त्यामुळे 39 हजार 250 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदारयादीत 26 हजार 320 नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत.