शेंडी-पोखर्डीच्या गौराई लढाईवर दुष्काळाचे सावट! | पुढारी

शेंडी-पोखर्डीच्या गौराई लढाईवर दुष्काळाचे सावट!

शशिकांत पवार

नगर तालुका : श्रावणी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी शेंडी-पोखर्डी (ता. नगर) या दोन गावांमध्ये गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई होत असते. उद्या (शुक्रवारी) गौराईची लढाई होत असली, तरी ज्या सीना नदीपात्रात ही लढाई होते, तिचे पात्र कोरडेठाक आहे. यंदाच्या दुष्काळाचे सावट आहे. या दोन दोन गावांची सीना नदी सीमारेषा आहे. या दोन गावांमधील महिलांमध्ये भांडण, शिव्यांची लाखोली, खेचाखेची,एकमेकींना ओढाओढी अशी लढाईची ऐतिहासिक परंपरा आहे. ही लढाई द्वेषाची नसते, तर प्रेमाची असते.

दर वर्षी श्रावणी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी दोन गावांमध्ये होणारी गौराईची लढाई प्रसिद्ध आहे. यानिमित्त या दोन्ही गावांत यात्रा भरते. मात्र, मागील वर्षाचा अपवाद वगळता,दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या दोन्ही गावांतील लढाई व यात्रा दोन वर्षे खंडित करण्यात आली होती. फक्त गौराईचे पूजन होऊन गौराईचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षी समाधानकारक पाऊस होता. सीना नदीला भरपूर पाणी होते. त्यामुळे दोन वर्षांच्या खडांनंतर गौराईच्या लढाईला रंगत आली. यावर्षी तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे. सीना नदीपात्र कोरडे पडले आहे.

गावातील जुने लोक सांगतात की या दिवशी दोन्ही गावांतील महिला सूर्यास्ताच्या वेळी गौराई देवीची पूजा करून तिची सवाद्य मिरवणूक काढतात. यावेळी दोन्ही गावांत मोठी यात्रा भरते. मिरवणूक सीना काठी आल्यानंतर दोन्ही गावांतील महिला सीना नदीपात्रात जमतात. तेथे गौराईचे विसर्जन करण्यात येते, मग सुरू होते लढाई. यावेळी महिला हातवारे करून एक दुसर्‍या गावातील महिलांना शिव्याशाप देतात. एकमेकींच्या कमरेला घट्ट पकडून सीना नदीपात्रात एकमेकींना ओढतात. आपल्या गटाकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दोन्ही गावात वाद होऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून ही लढाई बरोबरीत सोडविली जाते.

लढाईत पुरुषांचा हस्तक्षेप नको

गौराईची लढाई महिलांची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या या लढाईत पुरुषांचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे लढाईतील आनंद कमी होत आहे. दोन्ही गावांत वाद नको, म्हणून काही वेळाने लढाई बरोबरीने सोडवली जाते.

दोन वर्षे कोरोनामुळे गौराईची लढाई झाली नाही. गत वर्षी चांगला पाऊस झाला. सीना नदीला भरपूर पाणी होते. यंदा नदी कोरडी असली तरी परंपरेप्रमाणे लढाई होईल.

– प्रयागा लोंढे,
सरपंच, शेंडी

हेही वाचा

अपात्रता सुनावणीवरून शिंदे-ठाकरे गटांत कलगीतुरा

नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य कायम!

नगर : पोलिस हवालदाराकडून लेडी कॉन्स्टेबलची छेड

Back to top button