अपात्रता सुनावणीवरून शिंदे-ठाकरे गटांत कलगीतुरा | पुढारी

अपात्रता सुनावणीवरून शिंदे-ठाकरे गटांत कलगीतुरा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला, अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला सांगितले. न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही जाणूनबुजून विलंब करण्यासाठी क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी सुनावणीनंतर केला आहे. तर, ठाकरे गटच वेळकाढूपणा करत असल्याचा प्रत्यारोप शिंदे गटाने केला, तर मी न्यायिक अधिकारांतर्गत कामकाज करतोय. आरोप करणाऱ्यांनी खुशाल आरोप करावेत, पण मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.

करमत नसेल तर तिकडून इकडे या : भरत गोगावले, आमदार, शिंदे गट
• जर योग्य सुनावणी करायची होती तर ठाकरे गटाने सगळी कागदपत्रे आम्हाला आधीच द्यायला हवी होती. आता अध्यक्षांनीच कागदपत्रे द्यायला सांगितले आहे. कागदपत्रे मिळाल्यावर आम्ही उत्तर देऊ, असे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि सुहास कांदे यांनी सांगितले. तसेच, कुणीही वेळकाढूपणा करत नाही. विजय कुणाचा होईल हे कळेलच, त्यांना कल्पना आहे. आता फक्त १४ उरले आहेत. आम्ही त्यांना विनंती केली, तिकडे करमत नसेल तर इकडे या, असा टोला भरत गोगावले यांनी लगावला.

आरोपांना उत्तर देणार नाही : राहुल नार्वेकर, विधानसभाध्यक्ष
• मी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपावर भाष्य करणार नाही. मी सध्या न्यायिक अधिकारांतर्गत काम करतोय. त्यामुळे माझ्यासमोर जी सुनावणी होत आहे. त्यासंदर्भात बाहेर कुठलेही भाष्य करणे मला उचित वाटत नाही. ज्यांना बाहेर आरोप करायचे आहेत, त्यांनी खुशाल करावेत. त्यांनी आरोप केले तरी मी विधानसभा नियमांनुसार आणि घटनेत ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच काम करणार. या सुनावणीसाठी म्हणजेच ही कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मी दिला आहे. आवश्यक बाबी पूर्ण झाल्यानंतर पुढील सुनावणीच्या तारखा दोन्ही पक्षकारांना कळवल्या जातील.

तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल रवींद्र वायकर, आमदार, ठाकरे गट 
• विधान भवनातील सुनावणीत वादी-प्रतिवादी यांनी बाजू मांडली. गुरुवारी काही याचिका एकत्र करण्यात आल्या. शिंदे गटाच्या वकिलांनी दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला आहे. वेळ काढण्यासाठीच ही मागणी करण्यात आल्याचे आम्हाला वाटले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही अद्याप वेळकाढूपणा सुरू आहे. न्यायालयाने तीन महिन्यांचा वेळ दिला. परंतु, तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल, असे सध्या चित्र आहे.

आम्हाला सोडून गेलेले घरी जातील : भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट
• ३० जूनला शिवसेनेतील गट फोडून भाजपने सरकार बनवले. त्यांनतर आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे शेड्यूल १० प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी केली. परंतु, विधानसभाध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. सातत्याने वेळकाढूपणा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, भरत गोगावले हे व्हिप नाहीत. परंतु, अध्यक्षांनी त्यावरही कारवाई केली नाही. हे सरकार लवकरच पडेल. जे आम्हाला सोडून गेले आहेत ते घरी जाणार आहेत. अध्यक्षांनी १० अधिक ७ असे १७ दिवस दिले आहेत. आज शिंदे गटाच्या वकिलांमध्ये अस्वस्थता होती, असे भास्कर जाधव म्हणाले.

ही सुनावणी नव्हेच : कैलास पाटील, आमदार, ठाकरे गट
• खरे तर, प्रत्यक्षात सुनावणी झालीच नाही, असे म्हणावे वाटते. कागदपत्रांच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. आता दहा दिवसांचा वेळ त्यांना देण्यात आला आहे. एकच विषय असल्याने एकत्रित सुनावणी घेऊन पुढील आठवड्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी आमच्या वकिलांनी केली आहे. आता त्यावरसुद्धा म्हणणे मांडायला शिंदे गटाला वेळ दिला जाईल. यात वेळकाढूपणा होत आहे.

यापूर्वीच निर्णय यायला हवा होता सुनील प्रभू, मुख्य प्रतोद, ठाकरे गट
● शिंदे गटाने वेळकाढूपणा करण्यासाठी कागदपत्रे मिळाली नाही असे सांगितले. वेळकाढूपणाची कारणे दाखवायची आणि वेळ वाढवून घ्यायचा असा प्रकार सुरु झाला आहे. आम्ही आज अध्यक्षांकडे तत्काळ निर्णय घ्यावा असे प्रतिज्ञापत्र देणार होतो. परंतु काही सुधारणा करून आम्ही प्रतिज्ञापत्र देऊ. शेड्यूल १० प्रमाणे निर्णय आधीच येणे अपेक्षित होते.

Back to top button