नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य कायम! | पुढारी

नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य कायम!

संगमनेर शहर(नगर); पुढारी वृत्तसेवा : वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन शहरातून जाणार्‍या नाशिक- पुणे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून काम पूर्ण होऊनही हायमास्टचे दिवे बंदच असून यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणार्‍या नागरिक व वाहन धारकांना याचा त्रास व अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे दिवे तातडीने सुरु करण्याची मागणी होत आहे.
नाशिक- पुणे या मार्गावरची वाढती वाहतुक व प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी केंद्र शासनाने चौपदरी रस्ता केला. यामुळे वाहने सुसाट वेगाने धावू लागली असून व वाहतुकीचा वेळही कमी झाला. मात्र हा मार्ग अनेक गाव शहरा बाहेरून गेल्याने अनेक गावे ओस पडली असून महामार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे .

संगमनेर शहरातून होणारी वाढती वाहतूक लक्षात घेवून बायपास फाटा (अमृतवाहीनी इंजिनीअर काँलेज) ते बसस्थानक या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. 132 के. व्ही. पर्यंत रस्ता पुर्ण होवून दुभाजक टाकुन हायमास्ट बसविण्यात आले. गेल्या तीन, चार महिन्यांपासून काम पूर्ण होऊनही हायमास्टचे दिवे बंदच आहे.

हा रस्ता वर्दळीचा व महाविद्यालय, साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, बँका, बाजार समिती अशा महत्त्वाच्या संस्था असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता असते. रात्री हा महामार्ग अंधारातच असतो. वाहने चालविताना, पायी चालताना, दुचाकी, महिलांना याचा मोठा त्रास होत आहे. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून रात्रीच्या वेळेस अनेकदा अपघात झाले आहे.
या हायमास्टचे दिवे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याची आवश्यक आहे. यातच या हायमास्ट दिव्याचे विज बिल भरणे ग्रामपंचायतीच्या आवाक्या बाहेर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे दुतर्फा रस्ता असतांनाही पथदिवे बंद असल्याने गैरसोय होत आहे.

दिवे सुरू न केल्यास अधिकार्‍यांना घेराव

गेल्या अनेक महिन्यांपासून अधिकारी, ठेकेदार यांना विनंती करूनही शहरातील नाशिक- पुणे महामार्गाचे दुभाजकावरिल पथदिवे बंद सुरू केले नाही. महिला, जेष्ठ नागरिक, वाहन धारकांना याचा त्रास होऊन अपघात होतात. दिवे तातडीने सुरु न केल्यास अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा इशारा राजू खरात यांनी दिला आहे.

हेही वाचा

नगर : पोलिस हवालदाराकडून लेडी कॉन्स्टेबलची छेड

Pune Ganeshotsav : गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजींच्या जागी आता अ‍ॅप

Pune Crime News : संतापजनक! भीक मागण्यासाठी 2 हजारांत चिमुकलीचा सौदा

Back to top button