धक्कादायक! पोटगीसाठी दावा केल्याने सासूचा खून; जावई अटकेत | पुढारी

धक्कादायक! पोटगीसाठी दावा केल्याने सासूचा खून; जावई अटकेत

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : न्यायालयात पोटगीची केस दाखल केल्याच्या रागातून जावयाने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात घालून सितेवाडी फाटा ते जुन्नर रस्त्यावरील गणेशखिंड (ता. जुन्नर, पुणे) येथील दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. लताबाई अरूण कडव (वय 70, रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात जावई बाळू तुकाराम विधाते (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करीत तपासकामी नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी मयत कडव यांचे दुसरे जावई अण्णा ढेरे (रा. बोल्हेगाव फाटा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

मयत लताबाई व त्यांचा जावई बाळू हा पत्नी, मुलाबाळांसह शिवाजीनगर, कल्याण रस्ता परिसरात राहतात. बाळू व त्याची पत्नी मीना यांचे लताबाई यांच्याशी मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. याप्रकरणी लताबाई यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी लताबाई या त्यांचे मानलेले भाऊ शिवाजी काळे (रा. हिवरेझरे, ता. नगर) यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या 31 ऑगस्ट रोजी काळे यांच्या जवळच्याच शेतात रूईची पाने तोडण्यासाठी गेल्या असता, तेथून बेपत्ता झाल्या होत्या.

दरम्यान, त्यांचा परिसरात शोध घेतला असता काळे यांच्या शेतातील रूईच्या झाडाजवळ लताबाई यांचा चष्मा व पायातील चप्पल व प्लास्टिकची गोणी तसेच फुटलेल्या बांगड्यांचे काचेचे तुकडे आढळून आले. तीन दिवस लताबाई यांचा शोध घेतल्यानंतरही त्या मिळून न आल्याने अखेर दि.4 सप्टेंबर रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांकडून लताबाई यांचा शोध सुरू असताना, त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा जावई बाळू विधाते याने सासू लताबाईचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना नगर तालुक्यात घडल्याने हा तपास नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा उलगडा सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण, दिनकर घोरपडे, सुभाष थोरात, कमलेश पाथरूट, राजू खेडकर, सागर मिसाळ, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.

डोक्यात लाकडी दांडा घालून केला खून

लताबाई या नगर शहरातील दिल्लीगेट येथील शनी मंदिरासमोर पानफुले, रूईची पाने विक्री करत. त्यांचा जावई देखील तेथेच पानफुले, रूईची पाने विक्री करतो. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी लताबाई हिवरेझरे येथे काळे यांच्या शेतात रूईची पाने आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे जावई बाळूही आला. त्यांच्यात पोटगीची केस केल्याच्या कारणातून वाद झाला. या वादातून बाळूने लताबाई यांचा डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला.

पोलिसांनी दरीतून शोधून काढला मृतदेह

लताबाई बेशद्ध होताच बाळूने त्यांना त्याच्या तवेरा गाडीच्या डिक्कीमध्ये टाकले. गाडी सितेवाडी फाटा येथून जुन्नर रस्त्याने गणेशखिंड येथे आणली. मृतदेह पोत्यात भरून झाडाझुडुपातील दरीत ते पोते फेकून दिले. विधाते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी त्याला गणेशखिंडीच्या दरीत नेले. तेथे लताबाई यांचा मृतदेह पोत्यात बांधलेला आढळून आला.

हेही वाचा

पिंपळनेर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Monsoon Update : आज पासून विदर्भात मान्सून सक्रीय; पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

Kareena Kapoor : राष्ट्रगीत गाताना करीना ट्रोल, संतप्त नेटकऱ्यांनी सुनावले (Video)

Back to top button