अडीच वर्षे घरी बसणार्‍यांचे दुष्काळी दौरे स्टंटबाजी! मंत्री विखे पा. यांचा ठाकरेंवर पलटवार | पुढारी

अडीच वर्षे घरी बसणार्‍यांचे दुष्काळी दौरे स्टंटबाजी! मंत्री विखे पा. यांचा ठाकरेंवर पलटवार

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अडीच वर्षे घरात बसून मंत्रालयाची दारे बंद ठेवणार्‍यांचे दुष्काळी दौरे म्हणजे एक प्रकाराची राजकीय स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांना रुपयाचीही मदत करु न शकलेल्या उध्दव ठाकरेंना महायुतीच्या पिक विमा योजनेवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पालक मंत्री विखे पा. माध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना उध्दव ठाकरे यांनी राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठ-मोठ्या घोषणा केल्या, परंतु त्याची पुर्तता केली नाही. यापुर्वी त्यांनी मराठवाड्यासह कोकणात जावून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु एकाही घोषणेची अंमलबजावणी ते करु शकले नाही. फक्त फेसबुकवर बोलत राहिले. सत्ता गेली. स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वही संपले, तेव्हा त्यांना आता शेतकर्‍यांची आठवण झाल्याची टीका करीत त्यांच्या दौर्‍याने काय साध्य झाले, कोणती मदत शेतकर्‍यांना मिळाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शासन आपल्या दारी उपक्रमावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना मंत्री विखे पा. म्हणाले, तुम्ही तब्बल अडीच वर्षे मंत्रालयाची दारेच बंद करुन बसला होता, मात्र आम्ही राज्यातील जनतेसाठी मंत्रालयाची दारे खुली केली आहेत. आत्तापर्यंत शेतकर्‍यांना 12 हजार कोटी रुपयांची मदत केली. तुमच्या सरकारच्या काळात पिक विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाली. विमा कंपन्यांच्या दारावर तुम्ही फक्त मोर्चे नेले, मात्र सत्तेच्या काळात या विमा कंपन्यांपुढे तुम्ही झुकला.

आमच्या महायुती सरकारने मात्र1 रुपयात पिक विमा देवून सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. दुष्काळी दौरे करण्यापेक्षा आम्ही शेतकर्‍यांना थेट मदत करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले.

शिर्डी व अ.नगर येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्याच्या निर्णयावर बोलताना मंत्री विखे पा. म्हणाले, जिल्ह्यात युवकांसाठी रोजगार निर्मितीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीस कोणतेही भूसंपादन न करता उपलब्ध शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव आहे असे सांगत, कोणतेही प्रदूषण होणार नाही, असे उद्योग येथे आणण्याचा माझा प्रयत्न आहे. काही आयटी कंपन्या व महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांच्याशी चर्चा झाल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

शिर्डीसह नगरच्या औद्योगिक वसाहतीला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा येत्या काळात निश्चित बदलेल, असा विश्वास व्यक्त करुन, सरकारने जिल्ह्यातील युवकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर टीका करणार्‍यांनी स्वत:च्या तालुक्यात औद्योगिक वसाहतींची काय परिस्थिती आहे, हे आधी पहावे, असा टोला आ. थोरात यांचे नाव न घेता मंत्री विखे यांनी लगावला.

हेही वाचा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांचा आजपासून पाणी त्याग

पुणे : कलाकार कट्ट्यावरील अतिक्रमण हटविले; महापालिका प्रशासनाची कारवाई

G20 Summit 2nd Day : PM मोदींसह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी राजघाटावर; महात्मा गांधींना अभिवादन

Back to top button