नगर : दुष्काळी परिस्थितीसाठी सज्ज रहा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ | पुढारी

नगर : दुष्काळी परिस्थितीसाठी सज्ज रहा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

नगर; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकार्‍यांना दिले. जिल्ह्यात मागेल त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

संभाव्य दुष्काळसदृष्य परिस्थितीत करावयाच्या उपायोजनांबाबत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यंत्रणांची संयुक्त आढावा बैठक आयोजित केली होती. त्याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाऊस न झाल्यास दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना कराव्यात. तालुकास्तरावर अधिकारी तसेच ग्रामस्तरावर काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सुचना देण्यात याव्यात. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे.

पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्यावत करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले. रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करुन प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवा. सर्वच यंत्रणांनी रोहयोची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करा, असेही त्यांनी सांगितले.

7 हजार 420 मजूर रोहयो कामावर

जिल्ह्यामध्ये 1 हजार 444 कामे सुरु असून, 7 हजार 420 मजूर कार्यरत आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 3 लक्ष 41 हजार 503 कामे असून त्यामधून 13 कोटी 27 लक्ष मनुष्य दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याचे उपजिल्हाधिकारी ( रोहयो) तळपदे यांनी बैठकीत सांगितले.

हेही वाचा

Rajendra Gudha | शिंदे गटात राज्याबाहेरुनही इनकमिंग! राजस्थानमधील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Asia Cup : भारताविरुद्धच्‍या सामन्‍यात पाकिस्‍तानची भिस्‍त कोणावर? कर्णधार बाबरने दिले उत्तर..

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी हुपरीत अर्धनग्न आंदोलन

Back to top button