

पुढारी ऑनलाईन : राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी राजस्थानमधील झुझुनू येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते राजेंद्र गुढा म्हटले की, "एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मी राज्यातील तरुण आणि महिलांच्या विकासासाठी काम करेन…"
राजस्थान विधानसभेत लाल डायरी दाखवल्यानंतर राजेंद्र गुढा चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतरही गुढा 'लाल डायरी' घेऊन राज्य विधानसभेत गेले होते. त्यांनी दावा केला होता की या डायरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधातील आरोपांची संपूर्ण यादी आहे. काँग्रेस मंत्री आणि आमदारांनी त्यांची ही डायरी काढून घेतल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांनी आपल्याकडे या डायरीचा दुसरा भाग असल्याचे त्यांनी म्हटले होते.
राजेंद्र गुढा यांच्या पक्ष प्रवेशासाठी स्वतः एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये गेले. उदयपूरवाटी येथील कार्यक्रमात गुढा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला पाठीमागे नेले. आता महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार चांगले काम करत आहे. राजस्थानला पुढे नेण्यासाठी सत्ता परिवर्तन गरजेचे आहे. राजकारणात गुढा यांच्यासारख्या व्यक्तींची गरज असल्याचे नमूद केले.
गुढा यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गुढा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राजेंद्र गुढा राजस्थानमधील झुंझून जिल्ह्यातील उदयपुरवाटी येथील आमदार आहेत. त्यांनी आपल्या नावासोबत गावाचे नावही जोडले आहे. त्यामुळे त्यांचे नाव राजेंद्र गुढा असे आहे. गुढा हे २०१८ मधील निवडणुकीत बसपाच्या तिकीटावर दुसऱ्यांदा निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. ते यापूर्वी गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यानंतर त्यांची पायलट यांच्या गटाशी जवळीक राहिली. यादरम्यान त्यांनी गेहलोत यांच्या विरोधात वक्तव्ये केली होती.
हे ही वाचा :