फोडाफोडीचे सरकार पुन्हा दिसणार नाही : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

फोडाफोडीचे सरकार पुन्हा दिसणार नाही : आ. बाळासाहेब थोरात

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकार म्हणजे एकाच म्यानात तीन तलवारी आहेत. आमचे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या आशेने तिकडे गेले; मात्र पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्याशिवाय पुढे जात नाही. आमदारांची फोडाफोडी करून आलेले सरकार पुन्हा राज्यात दिसणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हिरडगाव येथे व्यक्त केला. काँग्रेसच्या विभागीय जनसंवाद यात्रेचा प्रारंभ थोरात यांच्या हस्ते सोमवारी भरपावसात करण्यात आला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. त्याअगोदर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रीगोंदा येथील काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

थोरात म्हणाले, शेतकर्‍यांवर आस्मानी आणि सुलतानी संकट आले. पण हे सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलत नाही आणि प्रश्न सोडवत नाही. नरेंद्र मोदी महागाई आणि रोजगार याकडे लक्ष देत नाहीत. फक्त ईडी, इन्कम टॅक्सवाले मागे लावून फोडाफोडी करण्यात धन्यता मानत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमय होत आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन विचाराची पेरणी करावी. नागवडे म्हणाले, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. नोकर्‍यांमध्ये कपात केली त्यामुळे देशभर महागाई आणि बेरोजगारीचा वणवा पसरला आहे.

नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर म्हणाले, हिरडगाव परिसरात एक विजेचे सबस्टेशन होणे गरजेचे आहे. आमदार लहू कानडे, अंबादास दरेकर यांची भाषणे झाली. प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब भोस, शुभांगी पोटे, मनोहर पोटे, हेमंत ओगले, प्रेमराज भोयटे, राकेश पाचपुते, योगेश भोयटे, अ‍ॅड सुनील भोस, भगवान कणसे, विठ्ठल वांळुज, सुधीर जामदार, भाऊसाहेब नेटके, मच्छिंद्र सुपेकर, संदीप औटी उपस्थित होते.

‘सरकारने काठी उगारण्याचे काम केले’

अनुराधा नागवडे म्हणाल्या, मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले तर सरकारने काठी उगारण्याचे काम केले याची किमंत भाजपला मोजावीच लागेल.

हेही वाचा

Nashik : चांदवडला पावसासाठी मुस्लीम बांधवांकडून नमाजपठण

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंडमध्ये फसवणूक

परभणी : मराठा आरक्षणासाठी सावरगावच्या महिला उपसरपंचाने दिला राजीनामा

Back to top button