नगर : विद्यार्थ्यांना टवाळखोरांची मारहाण ; सहा तरूणांविरूद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल | पुढारी

नगर : विद्यार्थ्यांना टवाळखोरांची मारहाण ; सहा तरूणांविरूद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांना टवाळखोर तरूणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिसगाव येथील सहा तरूणांविरूद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यालयातील पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी हे भांडण मिटविले. त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका स्वीटच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले या दोघांना जबर मारहाण केली.

यानंतर शिरापूर त्रिभुवनवाडी येथील ग्रामस्थ शनिवारी तिसगावमध्ये आले. या तरूणांचा शोध घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात येऊन वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला. किशोर सोपान बुधवंत रा.शिरापूर या विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून आरमान पठाण, सोहेल लालखाँ पठाण, आतिक पठाण, मोसिन शेख, आझाद पठाण, तोहेब असीफ सय्यद सर्व रा.तिसगाव यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 तासात या सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी दिल्यानंतर तिसगाव येथील वातावरण शांत झाले.

यावेळी भाऊसाहेब लवांडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील परदेशी, सरपंच नितीन लोमटे, काका लवांडे, अखिल लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर आदींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

शाळेने टवाळखोरांवर कारवाई करावी
शाळा परिसरात सातत्याने काही टवाळखोर तरूणांकडून बाहेरगावच्या तरूणांना, विद्यार्थ्यांना दमबाजी व मारहाण केली जात आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासनानेही संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाऊसाहेब लवांडे यांनी केली.

हेही वाचा :

Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर-पुणे एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवली

मराठा आंदोलन पडसाद : खेड तालुक्यात कडकडीत बंद !

Back to top button