कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अयोध्या येथे होणार्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव व संचालिका डॉ. सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांचे वतीने खास निमंत्रण देण्यात आले आहे. दि. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे.
या सोहळ्यासाठी देशभरातून केवळ दोन हजार व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले असून यामध्ये डॉ. योगेश जाधव व डॉ. स्मितादेवी जाधव यांचा समावेश आहे. डॉ. योगेश जाधव सपत्नीक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी एकूण आठ हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी सहा हजार साधू-संत आणि देशभरातील विविध धार्मिक संस्थांचे मठाधिपती आणि पदाधिकारी असणार आहेत; तर दोन हजार नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळाचे चेतन गोरे, कोल्हापूर विभाग संघचालक चार्टर्ड अकौंटंट प्रताप कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख चार्टर्ड अकौंटंट अनिल चिकोडी, कोल्हापूर जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, चार्टर्ड अकौंटंट सतीश डकरे यांनी जाधव कुुटुंबीयांची भेट घेऊन हे निमंत्रण त्यांना दिले. दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. डॉ. योगेश जाधव व डॉ. स्मितादेवी जाधव यांनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
75 देशांतील मान्यवरांना निमंत्रण
श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह जगभरातील 75 देशांतील विशेष निमंत्रित व देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.