अहमदनगर
अहमदनगर : एक हजार गावांत काँग्रेसचा जनसंवाद; राजेंद्र नागवडे यांची माहिती
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकारच्या अन्यायकारक धोरण भ्रष्टाचार लोकशाहीची गळचेपी व सत्तेचा गैरवापर या विरोधात जनसमानसामध्ये जागृती निर्माण करण्याचे हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर जनसंवाद पदयात्रा काढली जाणार आहे. उत्तर विभागीय पदयात्रेला ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील एक हजार गावापर्यंत ही जनसंवाद पदयात्रा जाणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रेचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीस आमदार लहू कानडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नागवडे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील 146 पंचायत समितीचे गण विचारात घेऊन प्रत्येक पंचायत समिती गणात असणार्या मंडल काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्याचे काम मंडल काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहेत. जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या विविध प्रश्नांची मांडणी करणार्या कॉर्नर सभाचे आयोजन या निमित्ताने केले जाणारे असून भारतीय जनता पार्टीचे सरकारची शेतकरी विरोधी धोरणाबाबतची भूमिका या निमित्ताने मांडण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ म्हणाले, प्रत्येक गावात स्वतंत्र पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटाच्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेच्या गावात पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, तालुक्याच्या ठिकाणी तालुका पातळीवर काँग्रेसच्या सर्व संघटना एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात 3 ते 13 सप्टेंबर या दहा दिवसांच्या काळात पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार लहु कानडे, धर्मनाथ काकडे, बाळासाहेब आढाव, नासिर शेख, अरुण म्हस्के, अरुण पाटील नाईक, समीर काझी, शिवाजी नेहे, भानुदास बोराटे, संभाजी माळवदे, प्रकाश पगारे, शोभा पातारे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस प्रशांत दरेकर, कार्लस साठे, रंजन जाधव, विष्णुपंत खंडागळे, शहाजीराजे भोसले, संदीप पुंड, रिजवान शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मोहसीन शेख, प्रवीण गीते, अज्जू शेख, प्रकाश शेलार, संभाजी माळवदे, संजय पगारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा

