कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का ? | पुढारी

कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का ?

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का? असे म्हणण्याची वेळ पदाधिकारी व नगरसेवकांवर आली आहे. नगरसेविका छाया शेलार यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर एक सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी व नगरसेवक बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. माझी वसुंधरा अभियानात प्रथम आलेल्या कर्जत नगरपंचायतीत अनेक महिन्यांपासून मुख्याधिकार्‍यांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर विपरित परिणाम झाले आहेत.

निवेदनावर नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, नगरसेविका ताराबाई कुलथे, भाऊसाहेब तोरडमल, संतोष मेहत्रे, सतीश पाटील, भास्कर भैलुमे, मोनाली तोटे, नामदेव राऊत, ज्योती शेळके, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, अमृत काळदाते, प्रतिभा भैलुमे आदींच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायतीत मुख्याधिकारी, शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, गट क, श्रेणी ब, नगररचना सहायक अभियंता, कर निरीक्षक, सहायक करनिरीक्षक ही सर्व पदे प्रभारी प्रतिनियुक्तीवर आहेत. वरील सर्व पदावरील अधिकारी यांची कर्जत नगरपंचायतमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती होणे गरजेचे आहे.

नगरपंचायतीत प्रतिनियुक्तीवरील नियुक्त आणि अनेक पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. कामाचा आराखडा वेळेवर न होणे, बिले अदा न होणे, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, वैयक्तिक शौचालय प्रकरणे, बांधकाम परवाने, नवीन जागेच्या नोंदी ,पाणीयोजना, विद्युत विभाग व नगरसेवकांच्या प्रभागातील कामे खोळंबली आहेत.

यासंदर्भात नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास अगोदर बर्‍याचदा पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. हीपदे रिक्त राहिली. त्यामुळे सर्व पदाधिकारी 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

हेही वाचा

तीन सप्टेंबरपासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

सत्ताधारी आमदार गोंधळलेले

पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट

Back to top button