अहमदनगर : कॉपरचे पाईप चोरणारी टोळी गजाआड | पुढारी

अहमदनगर : कॉपरचे पाईप चोरणारी टोळी गजाआड

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रुग्णालयातून सुमारे 13 लाखांचे कॉपरचे पाईप चोरणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या टोळीकडून सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेर येथील गंगामाई घाट परिसरातून एलसीबीच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली असून, भंगारात चोरीचा मुद्देमाल खरेदी करणार्‍या एकाला अटक केली आहे. संदीप ऊर्फ जब्या संजय वाल्हेकर, निखील ऊर्फ अजय विजय वाल्हेकर (वय 19, दोघे रा. आठरापगडजाती, बेल्हाळेरोड, ता. संगमनेर) व सागर बाळू गायकवाड (वय 19, रा. साठेनगर, घुलेवाडी ता.संगमनेर), अफजल अहमद शेख (रा. विजयनगर, कुरणरोड, संगमनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घुलेवाडी येथील रुग्णालयातून ऑक्सीजन पाईप व कॉपरचे पाईप असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, संदीप संजय वाल्हेकर याने साथीदारांसह हा गुन्हा केला आहे. त्यानंतर एलसीबीने तीन आरोपींना गंगामाई घाट येथून अटक केली. अटक केलेले तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तीन आरोपी पसार

अक्षय सावन तामचोकर (रा. भाटनगर, घुलेवाडी, ता.संगमनेर), शुभम ऊर्फ पप्पू बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) व मयूर राखपसरे (रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) हे तीन आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

पाईपची भंगारात विक्री

आरोपींनी पाईपची भंगारात विक्री केल्याची कबुली दिली आहे. चोरीतील माल शाहीन अब्दुल अली खान (रा. इदगाह, मैदानाजवळ, संगमनेर) व अफजल अहमद शेख (रा. विजयनगर, कुरणरोड, संगमनेर) यांना विक्री केल्याचे सांगितले. सव्वासात लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

हेही वाचा

कर्जत नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का ?

पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट

राज्यातील महिला मतदारांवर काँग्रेसचे लक्ष

Back to top button