राज्यातील महिला मतदारांवर काँग्रेसचे लक्ष | पुढारी

राज्यातील महिला मतदारांवर काँग्रेसचे लक्ष

राजन शेलार, मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली नवीन कार्यकारिणी म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली. ही कमिटी पक्षात अतिशय महत्त्वाची समजली जाते. पक्षाच्या ध्येय-धोरणांबद्दल या समितीत चर्चा करण्यात येते. पक्षाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या समितीमार्फत घेतले जातात. काँग्रेसला मतदान करणार्‍या महिलांचे प्रमाण कमी असल्याने आगामी निवडणुकीत महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीत राज्यातील तीन महिला नेत्यांना संधी देण्यात आली.

अशोक चव्हाण यांचे प्रमोशन…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या समितीमध्ये समावेश करीत पक्षाने त्यांचे प्रमोशन केले आहे. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते होण्यामागे चव्हाण यांचाच त्यांना कौल होता, ही बाब महत्त्वाची होती. पण दिल्लीश्वरांनी आता त्यांचा कार्यकारिणीत समावेश केल्याने महाराष्ट्रासंदर्भात निर्णय घेताना अशोक चव्हाण यांच्या मताला वजन आले आहे. याची कारणेही वेगळी आहेत.

2009 साली अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात आदर्श प्रकरणात त्यांच्यामागे ग्रहण लागले होते. आता हे ग्रहण बर्‍यापैकी दूर झाले आहे. दुसरे कारण म्हणजे, भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून सत्ता स्थापन केली आहे. तोच प्रयोग काँग्रेसच्या बाबतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपाचे मुख्य लक्ष्य अशोक चव्हाण हेच होते. याची जाणीव काँग्रेसलाही होती. त्यामुळे त्यांना निर्णय प्रक्रियेपासून किंवा महत्त्वाच्या जबाबदार्‍यांपासून दूर ठेवणे हे काँग्रेसलाही परवडणारे नव्हते. त्यामुळे चव्हाणांची कार्यकारिणीत वर्णी लावत त्यांना सक्रिय केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण, थोेरात यांचा समावेश नाही

काँग्रेसने कार्यकारिणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश केला नाही. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले व प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव असलेले पृथ्वीबाबा यांची कार्यकारिणीत वर्णी लागणार अशी अटकळे बांधली जात होती. परंतु, ती फोल ठरली.

विदर्भातील चौघांचा समावेश

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यसमितीतून माजी मंत्री नितीन राऊत यांना वगळले असले तरी मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे व यशोमती ठाकूर या विदर्भातील चार नेत्यांचा समावेश करून समतोल साधण्याचा प्रयत्न करत स्थानिक पदाधिकार्‍यांना काँग्रेस नेतृत्वाने खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचा मुख्य जनाधार हा दलित, आदिवासी व मुस्लिम समाज राहिला आहे. काँग्रेसचा हा जनाधार कमी झालेला दिसतो. त्यामुळे कार्यकारिणीवर मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांची कायम निमंत्रितांमध्ये वर्णी लावत दलित समाजाला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला नेत्यांकडेही जबाबदारी

काँग्रेस कार्यकारिणी समितीत राज्यातील तीन महिला नेत्यांना संधी देण्यात आली. यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या दोघींचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या प्रभारी म्हणून खासदार रजनी पाटील यांची झालेली निवड तसेच यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या दोन्ही आमदारांना काँग्रेस कार्यकारी समितीत मिळालेले स्थान किंवा नुकतीच वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती यातून गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये महिला नेत्यांकडे महत्त्वाची पदे सोपविण्यात येऊ लागली आहेत. अमरावती जिल्ह्यातील यशोमती ठाकूर या राहुल ब्रिगेडमधील सदस्या म्हणून ओळखल्या जातात. तीनदा विधानसभेवर निवडून आलेल्या ठाकूर यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व बालविकास विभागाचे मंत्रिपद भूषविण्यास मिळाले होते. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठाकूर यांनी विरोधी बाकावरून सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. हिंदी व इंग्रजीवरील प्रभुत्व आणि दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी ठाकूर यांना मिळाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांनी तिसर्‍यांदा आमदारकी भूषविताना स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.सोलापूर हा काँग्रेसचा एकेकाळी असलेला बालेकिल्ला शाबूत राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Back to top button