अहमदनगर : पाणी आणि चारा वापराचे नियोजन करा : जिल्हाधिकारी सालीमठ

अहमदनगर : पाणी आणि चारा वापराचे नियोजन करा : जिल्हाधिकारी सालीमठ
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : संभाव्य टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेऊन, धरणांतील उपलब्ध पाण्याचे शेती आणि पिण्यासाठी होणारी मागणी तसेच सध्या उपलब्ध चारा आणि आगामी काळात आवश्यक आणि उपलब्ध होणारा चारा यांचे नियोजन करुन तसा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी गुरुवारी जिल्ह्यातील संभाव्य पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त पंकज जावळे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, 'मुळा'च्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, 'कुकडी'चे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आदीसह तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र, उत्तरेतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा या धरणांत 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, दक्षिण भागातील लहान-मोठे प्रकल्प अद्याप रिकामेच आहेत. धरणांतील उपलब्ध पाण्यापैकी जुलैअखेरपर्यंत पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, खरीप हंगामात कोणकोणत्या पिकांची लागवड झाली, त्यासाठी आवश्यक पाणी किती लागेल, याची माहिती घेऊन नियोजन करा. खरीप हंगामातील पिकांचे आवर्तन देऊन रब्बीसाठी किती पाणी उरणार आदी सर्व प्रकारांचे नियोजन करून तसा आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले.

गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी संभाव्य टंचाई परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले. पावसाअभावी चाराटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. महिनाभर पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे वैरण विकास योजनेमार्फत चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच आगामी काळासाठी चारा कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news