कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना मिळणार ‘आभा’ गोल्डन कार्ड | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना मिळणार ‘आभा’ गोल्डन कार्ड

कोल्हापूर, डॅनियल काळे : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक लाख कुटुंबांना आयुष्मान भारत (आभा) गोल्डन कार्ड मिळणार आहे. यापूर्वी 2011 च्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाचा आधार घेऊन बनवलेल्या यादीत नाव असणार्‍या कुटुंबांनाच हे कार्ड मिळत होते. केंद्र सरकारची ही योजना आहे. अलीकडे या बाबतीत केंद्राने शिथिलता आणली आहे. त्यामुळे या योजनेत जिल्ह्यातील आणखीन एक लाख कुटुंबांचा समावेश होणार आहे. याबाबतच्या याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे.

राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेप्रमाणेच केंद्राची देखील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ मिळणार्‍या संभाव्य पात्र लाभार्थ्यांची यादी 2011 च्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून निश्चित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील 8 लाख नागरिकांना लाभ मिळणार होता. कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. समाविष्ट नावांपैकी सुमारे 3 लाखांवर नागरिकांनी गोल्डन कार्ड काढले आहे. त्यामुळे दरवर्षी त्या कुंटुंबातील प्रत्येक सदस्यावर एक लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. विशेष म्हणजे देशभरात कोठेही उपचार करण्याची मुभा आहे. सरकारी रुग्णालयाप्रमाणेच राज्यभरातील सुमारे 1300 हून अधिक नोंदणीकृत रुग्णालयात याचा लाभ मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचीही मर्यादा आता पाच लाखांपर्यंत गेल्याने अतिगंभीर व महागडे उपचार असणारे आजार देखील यामध्ये समाविष्ट होणार आहेत. यापूर्वी 900 आजारांसाठी ही योजना लागू होती. आता 1209 प्रकारच्या आजारांवर उपचार होणार आहेत. महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे याबाबतची माहिती मिळणार आहे.

रेशनकार्ड सांभाळा

रेशनकार्ड हेच या योजनांसाठी महत्त्वाचा पुरावा आहे. अनेकजण सध्या रेशनकार्डच वापरत नाहीत. त्यामुळे कार्ड कोठेतरी अडगळीत पडलेले असते. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडला की मग रेशनकार्डचा शोध सुरू होतो. त्यामुळे नागरिकांनी रेशनकार्ड जपूनच ठेवावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डवरील 12 आकडी नंबर सुस्पष्ट असावा. ही सर्व कामे वेळीच करून घेतली तर या दोन्ही योजनेतील लाभ घेणे सहज शक्य होणार आहे.

Back to top button