अहमदनगर : घंटानाद विरुद्ध टाळ-मृदुंगाचा गजर | पुढारी

अहमदनगर : घंटानाद विरुद्ध टाळ-मृदुंगाचा गजर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डीतील प्रभारी अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईच्या मागणीसाठी उपोषण व घंटानाद करणार्‍या जांभळी येथील आम आदमी पार्टीच्या किसन आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांच्या विरोधात गुरुवारी (दि. 24) एकनाथवाडीच्या शेकडो ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत टाळ-मृदुंगाचा गजर करत प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेत आम आदमी पार्टीचे उपोषण सुरू आहे.

या उपोषणाच्या निषेधार्थ आलेल्या एकनाथवाडीच्या ग्रामस्थांचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आवारात एका समाजसेवकाने आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी एकनाथवाडीच्या रोजगार हमी योजनेचा विषय घेतला आहे. मात्र येथील मनरेगातील विहिरीपोटी याच समाजसेवकाने अधिकार्‍यांकडून मोठी माया जमा केली आहे. पुन्हा आणखी मागणी करत आहे.

त्यामुळे आम्ही दोनशे ग्रामस्थांनी झेडपीत आंदोलन करत सीईओंची भेट घेतली. कोणीही अर्ज देईल व कामे थांबवील, हे चुकीचे आहे. त्यामुळे एकनाथवाडीत काम होत नाही. घरकुल होत नाही, विहीर होत नाही, मनरेगाची कामे होत नाहीत. लाखो रुपये पडून आहेत. त्यामुळे सीईओंनी ‘त्या’ आंदोलनाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर सीईओंनी दोन दिवसांत याबाबतचे पत्र दिले जाईल, अशी ग्वाही दिल्याचेही खेडकर म्हणाले.

इव्हेंट करून कोणी खासदार होत नसतो!

नीलेश लंके यांना कोणालाही समर्थन द्यायचे असेल, तर त्यांनी खातरजमा करावी. इव्हेंट करून कोणीही खासदार होत नसते. मुळात लंके का आले, तर ते गोकुळ दौंड यांच्यामुळे आले. मग त्यांनाही माझा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही पद सोडता, प्रशासक असल्याने तुम्ही हस्तक्षेप का करावा, हाही प्रश्न आहे, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर म्हणाले.

हेही वाचा

लवंगी मिरची : बोरीचा बार

अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक; अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा

माझ्यावर आरोप करण्यासारखे काही नसल्याने असले उद्योग : हसन मुश्रीफ

Back to top button