लवंगी मिरची : बोरीचा बार

लवंगी मिरची : बोरीचा बार
Published on
Updated on

आपला देश आणि विशेषत: राज्य हे अद्भुत परंपरांचा प्रदेश आहे, असे म्हणावे लागेल. 'बोरीचा बार' नावाची प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या दोन गावांमध्ये कित्येक वर्षांपासून सांभाळली जाते. या दोन्ही गावांच्या महिला नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावांच्या दरम्यान वाहणार्‍या ओढ्यात उभ्या राहून शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालत असतात. ढोल, ताशा, डफडे, शिंगाडे या वाद्यांच्या निनादात यावर्षी 300 महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्या घातल्या. हे द़ृश्य पाहण्यासाठी शेकडो गावकरी तिथे जमा झाले होते. बोरीचा बार घालत असताना म्हणजे हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहताना, जसजसा वाद्यांचा आवाज वाढत होता तसतसा महिलांचा उत्साह वाढून, टाळ्या वाजवून त्या एकमेकींना आव्हान देत होत्या. त्यातच बघ्यांची गर्दीसुद्धा महिलांना चिअरिंग करत होती. गर्दी आवरता आवरता पोलिसांनाही नाकीनऊ आले होते. ही परंपरा म्हणे शेकडो वर्षांपासून सुरू आहे.

ही वेधक बातमी वाचताच, आमच्या तिरक्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. आधी ती समजून घेऊयात. म्हणजे पहा, बोरीचा बार घालत घालत, एकमेकींना शिव्या घालणार्‍या या महिला दुसर्‍या दिवशीपासून बहिणी-बहिणीसारख्या किंवा मैत्रिणी-मैत्रिणीसारख्या राहतात. राज्याच्या राजकारणामध्ये दररोज सुरू असलेला बोरीचा बार पाहून आम्हाला असे वाटले की, मुंबईच्या आसपास आझाद मैदानावर महिन्यातून एक दिवस असा बोरीचा बार घालावा आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना त्या ठिकाणी उभे करून एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. म्हणजे काय होईल की, एकमेकांना शिव्या घालण्याचे जी हौस आहे, ती त्या दिवशी पूर्णतः पुरवली जाईल आणि दुसर्‍या दिवशीपासून एकमेकांशी ते सहकार्याने वागायला लागतील. उन्माद वाढला की, त्याचा निचरा होणे आवश्यक असते. तसा निचरा करून घेण्याची ही परंपरा राजकीय लोकांनी सुरू करायला हरकत नाही, दररोज सकाळी नऊ वाजता एक भोंगा टीव्हीवर येऊन बोरीच्या बाराला सुरुवात करतो आणि त्यानंतर दिवसभर विविध पक्षांचे प्रवक्ते शिव्यांची लाखोली वाहत असतात.

अर्थात, यामुळे टीव्ही न्यूज चॅनलला बातम्या कमी पडतील. आमचे म्हणणे असे आहे की, टीव्ही न्यूज चॅनल्स बंद पडले किंवा डबघाईला आलेतरी चालेल; पण राज्यामध्ये दररोज सुरू असलेला हा बोरीचा बार बंद केला पाहिजे. जी काय शिव्यांची लाखोली वाहायची आहे, ती महिन्यातील ठरलेल्या एक दिवशी वाहून घ्या आणि उरलेले दिवस जनतेला शांततेने जगू द्या. देश हळूहळू विकसित होत असताना जगणे सोपे होत जाणार आहे; परंतु राजकीय लोकांनी एकमेकांना दिलेल्या शिव्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अवघड होत चालले आहे. बर्‍याचदा एकमेकांना शिव्या देणारे दुसर्‍या दिवशी गळ्यात गळे घालताना दिसून येतात आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे तिसर्‍या दिवशी एकमेकांना शिव्या देण्यात मग्न असतात. हा 'बोरीचा बार' नाहीतर दुसरे काय आहे? त्यापेक्षा सरळ सरळ काय ते एकदाचे वन टू का फोर करून घ्या.

एकमेकांना शिव्या देऊन घ्या आणि मग किमान एक महिना तरी शांत बसा. असाच बोरीचा बार राष्ट्रीय पातळीवरपण दिल्लीमध्ये एखाद्या प्रगती मैदानात भरवला पाहिजे. एवढेच नव्हे, तर राज्य आणि देश पातळीवर राजकारणामध्ये त्या रुजवल्या पाहिजेत. असे काही केले तरच राज्यामध्ये आणि देशांमध्ये शांतता नांदू शकेल; अन्यथा एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहण्याचा 'बोरीचा बार' सकाळ-दुपार-संध्याकाळ अव्याहत चालत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news