Maharashtra Politics | पुण्यामध्ये सगळेच खासदार, आमदार राष्ट्रवादीचे कुठे निवडून आलेत?, हसन मुश्रीफांचा रोहित पवारांवर निशाणा | पुढारी

Maharashtra Politics | पुण्यामध्ये सगळेच खासदार, आमदार राष्ट्रवादीचे कुठे निवडून आलेत?, हसन मुश्रीफांचा रोहित पवारांवर निशाणा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अनेकांचा विरोध डावलून आपल्याला संधी दिली, असा आपल्यावर आरोप केला जात आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच आपण त्यावेळी लढलो. मग विरोध कोणाचा होता? असा सवाल करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. रोहित पवार यांच्या आरोपाला प्रत्त्युतर दिले आहे. आरोप करायला काहीच मिळत नसल्याने असले उद्योग सुरू असल्याचेही ते म्हणाले. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. 2017 लाही तेच आणि 2019 ला काय घडलं, ते सर्वांनीच पाहिले आहे. हे केलं नसतं तर आजची ही परिस्थिती निर्माण झालीच नसती असे सांगून मुश्रीफ म्हणाले, आपल्या नेतृत्वाखाली पक्ष वाढला नाही असे म्हणणार्‍या आ. पवार यांनी पुण्यामध्ये तरी सगळेच खासदार आणि आमदार राष्ट्रवादीचे कुठे निवडून आले आहेत? त्यामुळे निवडणुका त्या-त्यावेळच्या परिस्थिती आणि वातावरणावर अवलंबून असतात, हे त्यांनी समजून घ्यावे. शरद पवार वडीलधारे आहेत. ते आपले दैवत आहेत, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, त्यांच्यामुळेच राजकारणात आपणास स्थान मिळाले हे आम्ही कधीच नाकारत नाही. ‘आमचे दैवत’ या भावनेपोटीच आम्ही त्यांचा फोटो लावतो; परंतु या मुद्द्यावर ते जर न्यायालयात जाणार असतील तर आम्ही काय करणार? असेही ते म्हणाले.

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन कारखानदारांच्या मुलाखती घ्याव्यात. मग समजेल दहशत आहे की नाही. उद्योग वाढणार नाहीत, असे आ. पवार म्हणत असतील तर ते खोटे आहे. सध्या तिथे एक इंचही जागा शिल्लक नाही एवढे उद्योग वाढले आहेत. औद्योगिक वसाहतींसाठी जमिनी गेलेल्या भूमिपुत्रांच्या नोकर्‍यांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी आग्रही राहणारच, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. (Maharashtra Politics)

Back to top button