मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : बोरवडे (ता. कागल) येथे रस्त्याने निघालेल्या वृद्धेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून चोरट्याने अंगावरील नऊ तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. विजयमाला पांडुरंग वारके (वय 71, मूळ गाव बोरवडे, सध्या राहणार कोल्हापूर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोल्हापुरात राहणार्या विजयमाला वारके मूळ बोरवडे गावी घरगुती कार्यक्रमानिमित्त येत होत्या. बिद्री बसस्थानकावर उतरल्यानंतर त्या बोरवडेकडे रस्त्याने चालत निघाल्या असताना गावापासून हाकेच्या अंतरावर पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांचे तोंड दाबून शेजारील उसात ओढत नेले. यावेळी त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तोंडात कापडाचा बोळा कोंबून ठार मारण्याची धमकी दिली. चोरट्याने वारके यांच्या हातातील दोन पाटल्या व एक बिलवर काढून घेतले. गळ्यातील दोन माळा हिसकावून घेतल्या. नंतर त्याने उसातून पोबारा केला. घटनेनंतर भेदरलेल्या वारके यांनी मुख्य रस्त्यावर येत आरडाओरडा केला. परंतु तोपर्यंत तो चोरटा पसार झाला होता.
याबाबत मुरगूड पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो आढळून आला नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजानन सरगर व त्यांचे सहकारी करत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत सूचना दिल्या.