पुण्याचे सीएमई ठरले पहिले ’कार्बन निगेटिव्ह गॅरिसन’ केंद्र | पुढारी

पुण्याचे सीएमई ठरले पहिले ’कार्बन निगेटिव्ह गॅरिसन’ केंद्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  5 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पूर्णपणे कार्बन निगेटिव्ह गॅरिसन बनले आहे. भारतातील असे हे पहिले केंद्र ठरले आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई), पुणे यांच्या खडकी कार्यालयामार्फत मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसद्वारे सीएमईचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगशी लढा देताना आघाडीवर राहण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सर्वांत मोठा प्रकल्प म्हणजे दोन टप्प्यांत 7 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी, सैनिकांसाठी सामुदायिक स्वयंपाकासाठी सोलर स्टीम कुकिंग प्लांट, रेट्रोफिटिंग उत्सर्जन नियंत्रण उपकरणाची स्थापना यांसारखे अनेक महत्त्वाचे पथदर्शी प्रकल्प उभे केले जात आहेत.

ग्लासगो सीओपी 26 मध्ये 2079 पर्यंत ‘नेट शून्य उत्सर्जन‘ साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य हाती घेणारे पुणे पहिले केंद्र असणार आहे.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या दिवसभराच्या ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 2021 मध्ये 2 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प सुरू करून 7 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा हाती घेण्यात आला. भारत सरकारच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय सौर मोहिमेचे‘ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसर्‍या टप्प्यात 5 मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्पाच्या यशामुळे भविष्यात कार्बन निगेटिव्ह होण्यासाठी इतर फॉर्मेशन्स आणि त्रि-सेवा आस्थापनांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय तिजोरीत वार्षिक 6.5 कोटी रुपयांच्या आर्थिक बचतीव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्य विद्युत ग्रीडशी जोडलेल्या 5 मेगावॉट पॉवर प्लांटमुळे सीएमई, पुणे येथे निर्माण होणारी वीज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी वापरणे शक्य होत आहे.

Back to top button