अहमदनगर : भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण…मात्र कुत्री मोकाटच! | पुढारी

अहमदनगर : भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण...मात्र कुत्री मोकाटच!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. नगरच्या चौकाचौकात रात्री अपरात्री आणि दिवसाढवळ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या मोकाट फिरताना दिसतात. या टोळ्या पादचारी आणि वाहन चालकांचे भुंकून स्वागत करण्यासाठी उभ्या असतात. अनेक वेळा त्या टोळ्या वाहन चालकावर सामूहिक हल्ला करतात. रात्रीच्या वेळी तर नगरकरांना जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करावा लागतो.

खासगी तत्वावर देण्यात आलेल्या श्वान निर्बिजीकरण कामात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरेगट) पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केली आहे. त्यांना एक निवेदनही देण्यात आले. यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, जेम्स आल्हाट, अरूण झेंडे, महेश शेळके, श्याम सोनवणे, मुन्ना भिंगारदिवे, गिरीष शर्मा, दीपक कावळे, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे आदी उपस्थित होते.

नगरकरांची आर्थिक फसवणूक

मागील वर्षी श्वान निर्बिजीकरण विषय प्राधान्याने हाताळण्यात आला. मनपाने हे काम खासगी तत्वावर देण्याचे ठरवून एका ठेकेदार संस्थेला दिले. त्या संस्थेने बोगस बिले काढून मनपाची आणि पर्यायाने नगरकरांची आर्थिक फसवणूक केली. यामुळे या खासगी श्वान निर्बीजीकरणाच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

थातुर-मातुर टेंडर प्रक्रिया

आताही तेच होणार आहे. यावर्षी याचे नव्याने टेंडर काढण्याचे ठरवण्यात आले असून, त्या प्रक्रियेत महिना तीन लाख रुपये देण्याचे मनपाने परस्पर ठरवले. तीन महिन्यासाठी नऊ लाख रुपयांचे ते काम आहे. आताही मागील ठेकेदार कंपनीला ते काम देण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी मनपा थातुर-मातुर टेंडर प्रक्रिया राबवित आहे. यामुळे पुन्हा हे काम कागदावरच होऊन लाखोंची बिले अदा होतील आणि मोकाट कुत्री रस्त्यावरच राहतील. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतच राहील, असे शिवसेनने सांगितले आहे. नाही तर, मोकाट कुत्री पकडून मनपाच्या दारात आणून बांधले जातील असा इशाराही निवेदनात दिला आहे.

‘श्वान निर्बिजीकरणात घोटाळा’

अनेक नागरिकांचा आणि आबाल वृद्धांचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने मृत्यही झालेला आहे. अशी परिस्थिती असताना मागील वर्षी श्वान निर्बिजीकरण आणि मोकाट कुत्री पकडण्यासाठी मनपाने ‘पीपल फॉर अनिमल्स’ या संस्थेला टेंडर दिले होते. या कामात प्रचंड असा घोटाळा झाला. प्रत्यक्ष सर्व कामे कागदावरच राहिले. प्रति श्वान निर्बिजीकरण केल्याचे दाखवून लाखोंची बिले काढण्यात आली.

हेही वाचा

पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर

कर्जत तालुक्यातील गावे पाण्यापासून वंचित : आ. रोहित पवार

संगमनेर : ऑक्सिजन प्लँटमधील तांब्याचे पाईप चोरून नेले

Back to top button