अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगरकरांच्या जिव्हाळ्याची अमृत पाणी योजना पूर्ण झाली असून, 'अमृत'चे पाणी वसंत टेकडीच्या टाकीत आले. परंतु, 'फेज टू'च्या लाईनची जोडणी व उपनगरातील पाण्याच्या टाक्याची चाचणी न झाल्याने अमृतचे पाणी जुन्या लाईनद्वारे नगरकरांच्या घरी जात आहे. पाईप वितरणासाठी नेमलेल्या दोन्ही संस्थांची बिले थकल्याने त्यांनी काम थांबविले. प्रकल्प समन्वयक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकार्यांचे बैठकीचे आश्वासन हवेतच विरले.
अहमदनगर शहराला पूर्वी पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला. परंतु, नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून अमृत पाणी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली. गेल्या काही वर्षांपासून योजनेचे काम सुरू होते. मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण प्रकल्प ते वसंत टेकडी पाण्याची टाकीपर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत अमृत योजनेच्या पाईपलाईनमधून पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे. आठ दिवस गढूळ पाणी आल्यानंतर आता स्वच्छ पाणी वसंत टेकडी येथे येत आहे. त्यातही अजून अमृतचे काही पंप सुरू करणे बाकी आहे.
दरम्यान, वसंत टेकडी येथील जुन्या व नवीन पाण्याच्या टाकीत अमृत योजनेचे पाणी टाकले जात आहे. त्यामुळे दोन्ही टाक्यांची पाण्याची लेव्हल मिळत आहे. सध्या अमृतचे आलेले पाणी जुन्या वितरण व्यवस्थेतून नगरकरांना पुरविले जात आहे. कारण, अमृतचे पाणी वितरणासाठी नगर शहरात टाकण्यात आलेली फेज टूची लाईन (काळे पाईप) अद्याप काही भागात त्यांची जोडणी करण्याचे काम बाकी आहे. शहरातील प्रत्येक भागात फेज टूचे पाईप अंथरण्यात आले आहेत. मात्र, ते एकमेकांना जोडणी न केल्याने आणि त्यांची चाचणी न घेतल्याने पुढील काम प्रलंबित आहे. पाईप टाकण्याचे आणि पाईप जोडण्याचे काम तापी प्रिस्टे्रस प्रोडक्ट व पार्वती अॅग्रो प्लास्ट या संस्थेला देण्यात आला आहे. मात्र, त्यांचे बिल थकल्याने त्यांनी पाईपलाईन जोडणीचे काम थांबविल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत अमृत योजनेचे पाणी आले. आता शहरातील विरतण व्यवस्थेचा आरखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने देणे अपेक्षित आहे. मात्र, जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना वारंवार सूचना करूनही प्रतिसाद मिळत नाही.
तीन महिन्यांपूर्वी महापौरांच्या दालनात जीवन प्राधिकरण व अन्य ठेकेदार संस्थांची महापौर व आयुक्तांनी बैठक घेतली. त्यावेळी निर्मलनगर येथील पाण्याचे टाकीची चाचणी घेण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप चाचणी झाली नाही.
शहरामध्ये फेज टूचे पाईप अंथरण्याचे काम तापी प्रिस्टे्रस प्रोडक्ट व पार्वती अॅग्रो या संस्थांना देण्यात आले आहे. शहरात पाईप अंथरून झाले असून, त्यांची केवळ जोडणी बाकी आहे. अंथरलेल्या पाईपची जलदाब चाचणी घेणे बाकी आहे. वितरण व्यवस्थेच्या कामातील गॅप्स करणे अनेक महिन्यांपासून बाकी आहे. झोननिहाय योजना कार्यान्वित करण्याबाबत सूचना देऊन काम पूर्णपणे बंद आहे.
पाणी वितरण संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिली आहे. मात्र, त्यात अनेक काम प्रलंबित आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, फेज टूची पाईपलाईन अंथरलेल्या संबंधित ठेकेदार संस्थांची येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल.
– रोहिणी शेंडगे, महापौर
फेज टूचे पाईप अंथरून पूर्ण झाले आहेत. मात्र, त्याची जोडणी व चाचणी बाकी आहे. संबंधित ठेकेदार संस्थांकडून काम होण्यास बिलंब होत असल्याने महापालिका आपल्या स्थरावर ते काम करणार आहे.
– डॉ. पंकज जावळे, आयुक्त
हेही वाचा