अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी 15457 मतदानयंत्रे रेडी | पुढारी

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी 15457 मतदानयंत्रे रेडी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत 180 मतदानयंत्रे खराब आढळून आली आहेत. यामध्ये 74 व्हीव्हीपॅटचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता 15 हजार 457 मतदानयंत्रे वापरण्यास पात्र असणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल व मे महिन्यात होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगातर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मतदारयादी, मतदानयंत्रांची सज्जता, मतदानकेंद्रांची देखभाल-दुरुस्ती हाती घेतली आहे. जिल्ह्यासाठी बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीकडून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट अशी एकूण 15 हजार 563 मतदानयंत्रे उपलब्ध झाली.

या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी नगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात 4 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली. त्यात कंपनीच्या अभियंता पथकाने 9 हजार 961 बॅलेट युनिटची तपासणी केली असता, 71 यंत्रे खराब आढळून आली. 5 हजार 602 कंट्रोल युनिटपैकी 35 यंत्रे खराब आढळून आली.

6 हजार 17 व्हीव्हीपॅट उपलब्ध

आपण केलेले मतदान संबंधित उमेदवारालाच पडले की नाही, याची पडताळणी मतदारांना करता यावी, यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध केली आहेत. जिल्ह्यासाठी 6 हजार 91 यंत्रे उपलब्ध झाली. या यंत्रांचीही प्रथमस्तरीय तपासणी झाली. यामध्ये 74 यंत्रे खराब आढळली आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी आता 6 हजार 17 यंत्रे उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : वडील रागावल्याने मुलाने जीवनच संपविले

राज्यातून पाऊस गायब ! चिंता वाढली!!

रायगड : सारीपाट खेळण्याची अनेक वर्षांची पंरपरा पनवेलमध्ये कायम!

Back to top button