कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा; आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी | पुढारी

कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा; आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : चालू खरीप हंगामात राज्यात विविध भागात जरी चांगला पाऊस पडलेला असला तरी मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदारसंघात पावसाने काही ठिकाणी 21 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडणार नाही, याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी असे म्हटले आहे की, चालू हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने मतदारसंघात खरीप पेरण्या होतील की नाही? याबाबत शेतकरी साशंक होते. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होवून बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही? अशी एकवेळ अवस्था होती. परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असतांना पुन्हा पावसाने ओढ दिली आहे. याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडणार नाही. यामुळे शेतकर्‍यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. पेरणी होताच धो-धो बरसणारा वरुणराजा यावर्षी ऐन गरजेच्या वेळी गायब झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातून खरीप तर जाणारच आहे. परंतु सरासरीहून कमी पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली जावून भविष्यात शेतकर्‍यांना जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवणार आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोपरगाव मतदार संघात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

हेही वाचा

अहमदनगर : गुटख्याचा लाखोंचा साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची राहाता-साकुरी रस्त्यावर कारवाई

काळम्मावाडी धरणाची गळती यंदा तरी रोखणार का?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी लडाखमध्ये लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला

Back to top button