राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी लडाखमध्ये लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला | पुढारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी लडाखमध्ये लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लडाख दुर्घटनेत शहीद झालेल्या 9 लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी शोक व्यक्त केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, अपघाताच्या त्‍या बातमीने “खूप दुःख” झाले. या सैनिकांच्या निःस्वार्थ बलिदानाबद्दल देशाचे ऋण आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्‍हणाल्‍या.

लडाखमध्ये चीन सीमेला लागून असलेल्या न्योमा परिसरात शनिवारी रात्री लष्कराचे एक वाहन दरीत कोसळून त्यातील 9 जवानांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. एक जवान जखमी आहे. ही दुर्घटना क्यारी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरील कारू गॅरीसनलगत झाली. ताफ्यात एकूण 5 वाहने होती. ताफ्यातील अन्य वाहने एकापाठोपाठ थांबली व त्यांतील जवानांनी बचावकार्य सुरू केले. जवानांनी आपल्या सहकार्‍यांना दुर्घटनाग्रस्त वाहनाबाहेर काढले. त्यातील दोघांचा श्वास सुरू होता. पैकी एकाचा पुढच्या काही सेकंदांतच मृत्यू झाला. जखमी जवानाला तातडीने रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले. दरीत कोसळलेल्या वाहनात 10 जवान होते. दरी अत्यंत खोल असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले.

दुर्घटनेत मरण पावलेल्यांपैकी एक ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) असल्याचे सांगितले जाते. जखमी जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. लडाखमधील दुर्घटनेतील भारतीय जवानांच्या मृत्यूने मी व्यथित आहे. त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत, असे सिंह यांनी म्हटले आहे.

 

Back to top button