काळम्मावाडी धरणाची गळती यंदा तरी रोखणार का? | पुढारी

काळम्मावाडी धरणाची गळती यंदा तरी रोखणार का?

कोल्हापूर, सुनील सकटे : काळम्मावाडी धरणाच्या गळतीत धरण सुरक्षेसाठी मान्य करण्यात आलेल्या गळतीपेक्षा दुप्पट वाढ झाली आहे. मेघोली धरण फुटल्याने पाटबंधारेच्या दूधगंगा प्रकल्प विभागातर्फे तातडीने तज्ज्ञांकडून धरणाची पाहणी करून गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठीचा प्रस्ताव जलसंपदा खात्याच्या दूधगंगा विभागाने मंत्रालयात पाठविला आहे. यंदा तरी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.

धरणातील पाण्याचा दाब वाढून धरणाच्या सुरक्षेस धोका होऊ नये, यासाठी नैसर्गिक पाणी सोडण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यासाठी या धरणातून प्रतिसेकंद (एलपीएस) 70 लिटर एवढ्या नैसर्गिक गळतीस पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार मान्यता आहे. या धरणाची नियमानुसार होणारी गळती 70 लिटर प्रतिसेकंद आहे. मात्र, सध्या ही गळती 320 लिटर प्रतिसेकंद सुरू आहे. यापूर्वी म्हणजे 2000 साली या धरणाची नियमित गळती 398 लिटर प्रतिसेकंद झाली होती. ग्राऊंटिंग करून ही गळती कमी करण्यात आली. मात्र, पुन्हा गळतीत वाढ होऊन ती 320 लिटर्स प्रतिसेकंद इतकी वाढली आहे. पुणे येथील सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने (CWPSR) तपासणी केली आहे. शास्त्रज्ञ सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने संपूर्ण धरणाची तपासणी करून गळती प्रतिबंधक उपाय सुचविले आहेत. याचा अहवाल 19 डिसेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची छाननी करून 25 जानेवारी 2023 रोजी शासनास पाठविला आहे. दरम्यान, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने 81 कोटी 35 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मान्यतेनंतर कामास सुरुवात होणार आहे.

धरण सुरक्षेसाठी मान्य गळती

धरणाच्या बांधकामाच्या सांध्यांतून होणारा पाण्याचा निचरा, मुख्य भिंतीतून होणारा पाण्याचा निचरा आणि फाऊंडेशनमधून होणारा पाण्याचा निचरा, अशा तिन्ही प्रकारांतून धरणातून नैसर्गिक गळती सुरू असते. या तिन्ही प्रकारांतून होणारा पाण्याचा निचरा म्हणजेच नियमानुसार गळती होय.

द़ृष्टिक्षेपात धरण

1977 साली बांधकामास सुरुवात
1999 साली बांधकाम पूर्ण
1999 साली पूर्ण क्षमतेने पाणीसाठा
25.40 टीएमसी धरणाची क्षमता
2000 साली नियमापेक्षा जास्त

Back to top button