माळीणची 9 वर्षं : कुटुंबे आजही अंधारात ! महावितरणने अनेकांचे मीटर नेले काढून | पुढारी

माळीणची 9 वर्षं : कुटुंबे आजही अंधारात ! महावितरणने अनेकांचे मीटर नेले काढून

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : दि. 30 जुलै 2014 ची सकाळी डोंगराचा कडा कोसळून त्याखाली माळीण गाव गाडले गेले. या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या 16 अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. मात्र, त्यांनाही नवीन गावठाणात घरे मिळाली. नवीन माळीण गावठाणातील काही घरांचे मीटर काढले आहेत, तर रिडिंगही घेतली जात नाही. ज्यांंचे मीटर राहिलेत त्याना भरमसाट वीज बिले दिली जात आहेत. मीटर काढलेल्या घरात अंधार आहे. प्रशासनाला व लोकप्रतिनिधींनावारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनही लक्ष दिले गेले नसल्याचे सीताबाई भिवा विरणक यांनी सांगितले.

पुनर्वसन गावठाणाच्या ठिकाणी असणारे तलाठी कार्यालय नेहमी बंद असते व आरोग्य उपकेंद्रातही सध्या 108 रुग्णवाहिका व डॉक्टर नसतात. परंतु येथे नेमणूक असणारे कर्मचारी हे फक्त लसीकरणाच्या दिवशीच येतात. बाकी वेळी हे उपकेंद्र नेहमीच बंद असते. यातच ग्रामपंचायतीचे कामकाजदेखील वेळेत होत नसल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसात कुठेही जमीन खचली नाही अथवा पाणी तुंबले नाही. माळीण एकदम सुस्थितीत राहिले आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनी पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होत तो दिवस डोळ्यासमोर येतो आहे. शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे 8.50 लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली.

पुनर्वसनासाठी लागले अडीच वर्षे
दुर्घटना घडल्याबरोबर माळीण फाट्यावर तात्पुरते निवारा शेड उभारून तेथे पुनर्वसन करण्यात आले व कायमस्वरूपी पुनर्वसन एक वर्षात करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली.

हेही वाचा :

जीव महत्त्वाचा की, सेल्फी? खडकवासला सांडव्याच्या पात्रात पर्यटकांची हुल्लडबाजी

Green Card : अमेरिकेत कायमस्वरुपी मुक्काम करायचा का?

Back to top button