जिल्हा न्यायालयात ‘ई-फायलिंग’ सेंटरचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात 'ई फायलिंग फॅसिलिटी सेंटर' सुरू होत आहे. याचे उद्घाटन दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते सोमवारी (दि. 31) दुपारी 1.45 वाजता कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बी. अग्रवाल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या वतीने हा उपक्रम महाराष्ट्र व गोवा राज्यात राबविण्यात येणार असल्याचे बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी सांगितले.
कार्यक्रमास वकील व पक्षकारांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. डॉ. उदय वारूंजेकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॅड. जयंत जयभावे, कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई यांनी केले आहे.

