रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रुईछत्तीशी, गुणवडी, वाटेफळ, साकत, वडगाव, मठपिंप्री, हातवळण गावांत संततधार पावसाने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बाजरी, कापूस, मका, सोयाबीन, कांदा पिकांना उभारी मिळाली; परंतु पिकांना आवश्यक उष्णता नसल्याने ती पिवळी पडत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सूर्य झाकळलेला असल्याने पिकांना उष्णता मिळालेली नाही. एकीकडे पावसाने पिकांना संजीवनी मिळली, तर दुसरीकडे पिके उष्णतेअभावी पिवळी पडू लागली आहेत.
एक महिनाभर पाऊस लांबणीवर गेल्याने पिकांची उशिरा पेरणी झाली. शेतकर्यांनी मका, कापूस, सोयाबीन पिकांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली. संततधार पाऊस पिकांना चांगला फलदायी ठरतो. गेल्या आठ दिवसांपासून या भागात पावसाने थैमान घातले आहे. शेतकर्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. आता, चांगले ऊन पडून पिके मोठ्या जोमाने येणे आवश्यक आहे.
मका, सोयाबीन, तूर, कापूस पिकांनी चांगली उभारी घेतली आहे. आता, पिकांची खुरपणी होणे आवश्यक आहे. पिकांची खुरपणी झाली की खते मारून पिके अजून जोम धरतात; परंतु पाऊस उघडीप देत नसल्याने पिकांच्या मशागती देखील लांबणीवर गेल्या आहेत. बाजरी, मका, तूर पिवळ्या दिसू लागल्याने फवारणी करण्याची गरज आहे.
उष्णता नसल्याने पिकांवर रोगराई पसरते, त्यातून शेतकर्यांना मोठा आर्थिक खर्च पडतो. खरीप पिकांवर शेतकर्यांची मोठी आर्थिक मदत अवलंबून असते. खरीप पिकांच्या उत्पन्नावर येणार्या पैशातून रब्बीची पेरणी केली जाते. खरीप पिकांचा खर्च होऊन रब्बीचे उत्पन्न शेतकर्यांच्या पदरात पडते. खरीप पिके जोमाने आली की, रब्बीची वाटचाल सुलभ होते.
मका आणि तुरीचे विक्रमी उत्पन्न या परिसरात होते. शेतकर्यांची पूर्ण आर्थिक मदार याच पिकांवर अवलंबून आहे. तूर, मकाला चांगला बाजारभाव मिळाला तर खरीप पिके खूप मोठा आर्थिक नफा मिळवून देतात. जवळपास 100 हेक्टर मका आणि 600 हेक्टर तुरीचे क्षेत्र असल्याने संपूर्ण शेत हिरवेगार फुलून आले आहे.
हेही वाचा