प्रदूषण : समुद्राचा रंग का बदलतोय ?

समुद्राचा रंग का बदलतोय ?
समुद्राचा रंग का बदलतोय ?
Published on
Updated on

गेल्या दोन दशकांत जगभरातील तब्बल 56 टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरीत्या बदलला आहे. महासागराच्या रंगातील फरक मानवी नजरेसाठी अत्यंत सूक्ष्म आहे. पण हा बदल आश्चर्यकारक नाही. मात्र, तो भयावह आहे.

जीवसृष्टी असणार्‍या पृथ्वी नामक एकमेव ग्रहावर 70 टक्क्यांहून अधिक भाग समुद्राने व्यापलेला आहे. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे आणि समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यावर ती धरण्याइतकी क्षमता नसल्यामुळे तिथे समुद्र नाहीत. याउलट पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण अधिक असल्यामुळे तापमान कमी असल्यामुळे या ग्रहावर समुद्र टिकून राहिले. आजवरच्या अवकाश विज्ञान संशोधनांमधून वापरण्याजोगे द्रवस्वरूप वाहते पाणी विश्वाच्या अफाट रचनेमध्ये पृथ्वी या ग्रहावरच आढळले आहे. खारट पाणी असणार्‍या समुद्राचा तळ क्षार, गंधक, वायू आणि अगणित प्रकारची खजिने यांचा भला मोठा साठा आहे. शिवाय माशांसह अनेक सागरी जीवांच्या रूपाने समुद्र मानवी समूहांना अन्नपुरवठाही करतो. पृथ्वीवरील सुमारे 97 टक्के पाणी महासागरात आढळू शकते. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खार्‍या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर 5 महासागर आहेत. या महासागरांनी पृथ्वीवरील 71 टक्के पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे. महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात. महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बनडाय ऑक्साईडच्या चतुर्थांश भाग शोषून घेते.

आपल्या पौराणिक कथांमध्ये समुद्राचा उल्लेख आढळून येतो. विष्णुपुराणात समुद्रमंथनाची कथा सविस्तरपणे सांगितली आहे. अध्यात्म, पौराणिक कथा, विज्ञान, मानवशास्त्र आणि एकंदर जीवसृष्टी अशा सर्वव्याप्त विषयांमध्ये असणारे समुद्राचे स्थान लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व लक्षात येते. वर्षानुवर्षांपासून आपण समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असल्याचे पाहात आलो आहोत. परंतु जागतिक हवामान बदलांच्या आजच्या युगात निसर्गाचे चक्रच पार पालटून गेले असून समुद्राच्या पाण्यावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून जगातील अर्ध्याहून अधिक महासागरांच्या पाण्याचा रंग बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. याची कारणे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित असल्याचे पर्यावरणवाद्यांचे ठाम मत आहे. तथापि, सद्य:स्थितीत संशोधक आणि अभ्यासक समुद्राच्या पाण्याचा रंग बदलण्यामागच्या कारणांचा शोध घेताहेत.

महासागराचा रंग हे त्या पाण्यातील जीवन आणि अन्य घटकांवर आधारित असते. सध्या दिसणारा रंगातील हा फरक मानवी नजरेसाठी अत्यंत सूक्ष्म असला तरी मागील दोन दशकांत जगभरातील तब्बल 56 टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरीत्या बदलला आहे. दरवर्षी होणारे नैसर्गिक बदल एवढेच याचे कारण नाही, याकडे अमेरिकेतील संशोधकांनी लक्ष वेधले आहे. विषुववृत्ताजवळील समुद्रात या पाण्याचा रंग हळू हळू अधिक हिरवट होत आहे. महासागराच्या पृष्ठभागाजवळील परिसंस्थेतील बदलांचे हे चिन्ह असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर तरंगणार्‍या प्लवकांमुळे किंवा अन्य कार्बनिक पदार्थ आढळून आले असून त्यातून या बदलांवर प्रकाश पडण्यास मदत होत आहे.

हिरवे बनत चाललेल्या समुद्रांच्या पृष्ठभागावर आता अनेक प्रश्न तरंगू लागले आहेत. 'नेचर' या विज्ञानपत्रिकेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रीय समुद्रविज्ञान केंद्रातील संशोधक बी. बी. कैल आणि त्यांच्या चमूने 2002 ते 2022 या 20 वर्षात उपग्रहांनी टिपलेल्या निरीक्षणातून पृथ्वीवरील महासागरांच्या रंगांचे संख्यात्मक विश्लेषण केले. एका वर्षात त्यांच्यात प्रादेशिकद़ृष्ट्या कसा बदल होते हे पाहून त्यांनी सुरुवातीला रंगांच्या नैसर्गिक फरकांचा अभ्यास केला. नंतर दोन दशकांमध्ये वार्षिक तफावतीत कसा फरक पडला, याचा अभ्यास केला. त्यानुसार विषुववृत्ताजवळील प्रदेशात हा रंग हळूहळू हिरवा झाल्याचे दिसून आले आहे.

अभ्यासकांच्या मते, अंतराळातून दिसणार्‍या समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून समुद्राच्या वरच्या थरात काय चालले आहे, याचे चित्र स्पष्ट होते. समुद्राचा रंग दाट निळा दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर फार जीवसृष्टी नसल्याचे मानले जाते. पण जेव्हा पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर बर्‍याच घडामोडी चालल्याचा अंदाज काढला जातो. विशेषत: समुद्रातील जिवाणूंची प्रकाशसंश्लेषण क्रिया सुरू असल्याचे यातून दिसते. ज्याप्रमाणे वनस्पतींच्या पानांमध्ये सूर्यप्रकाश शोषण्यासाठी हरित द्रव्य असते, त्याच प्रकारचे हरित द्रव्य या जिवाणूंमध्ये दिसते. महासागराच्या पाण्याचा हिरवा रंग 'फायटोप्लँक्टन' या वनस्पतीसारख्या सूक्ष्म जीवांत असलेल्या 'क्लोरोफिल' या हिरव्या रंगद्रव्यामुळे होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ 'फायटोप्लँक्टन'चा हवामान बदलाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी त्यांचे निरीक्षण करण्यास उत्सुक आहेत. हवामान बदलाचा कल लक्षात येण्यापूर्वी 'क्लोरोफिल'मधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी सुमारे तीन दशकांचा कालावधी लागेल, असे संशोधकांनी यापूर्वीच्या संशोधनाच्या आधारे सांगितले. कारण 'क्लोरोफिल'मधील नैसर्गिक, वार्षिक बदल हे जनजीवनावर प्रभाव टाकतील, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. अन्य महासागरांमध्ये, जिथे वार्षिक बदल क्लोरोफिलमधील बदलांपेक्षा कमी आहेत, तिथे हवामानबदलाचे परिणाम 20 वर्षांतच दिसून येऊ शकतात.

महासागरांमध्ये प्रत्यक्षात होत असलेले हे बदल आश्चर्यकारक नाहीत. मात्र, ते भयावह आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील सर्व समुद्रांना प्रदूषणाने ग्रासले आहे. दुसरीकडे समुद्रामध्ये टाकण्यात येणार्‍या कचर्‍यातील प्लास्टिक सागरी जीवांच्या मुळावर उठले आहे. आपल्या संस्कृतीत समुद्राचे पूजन केले जाते. कोकण किनारपट्टीच्या भागात आजही समुद्रपूजनाची परंपरा पाळली जाते. समुद्राशिवाय निसर्गाची कल्पना अशक्य आहे. पण आज प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यामुळे एकीकडे ग्लेशियर्स वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनार्‍यावरील महानगरे, देश बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे; तर दुसरीकडे आता समुद्राच्या पाण्याचा रंग बदलत असल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news