प्रासंगिक : भारतीय संस्कृतीमधील मैत्र! | पुढारी

प्रासंगिक : भारतीय संस्कृतीमधील मैत्र!

श्रीराम ग. पचिंद्रे

मानवाच्या मनात जेव्हा सामाजिक जाणीव निर्माण झाली, तेव्हापासूनच ‘मैत्री’ सुरू झाली. आज (दि. 30 जुलै) मैत्री दिन. त्यानिमित्तानं भारतीय संस्कृतीमधील चिरंतन आदर्श मानल्या गेलेल्या मैत्रीवर एक दृष्टिक्षेप.

मैत्री… एक परमपवित्र भावना! खर्‍या मैत्रीत स्वार्थ नसतो, अटी नसतात, अपेक्षा नसते… तसं कशाला, खर्‍या मैत्रीत तरी कशाला म्हणायचं? मैत्री म्हटल्यावर ती खरीच असते. मैत्री म्हटल्यावर ती खोटी कशी असेल? जी खरी असते, तीच मैत्री! आज जागतिक मैत्री दिवस आहे. हा दिवस सुरू करून तो साजरा करण्याची पद्धत अलीकडच्या काळात सुरू झाली. तथापि, हा दिवस साजरा करायला लागण्याच्या पूर्वी मैत्री ही गोष्ट अस्तित्वात नव्हती का? होतीच… मानवाच्या मनात जेव्हा सामाजिक जाणीव निर्माण झाली, तेव्हापासूनच ‘मैत्री’ सुरू झाली. म्हणून ह्या मैत्री दिनाच्या औचित्यानं भारतीय संस्कृतीमधील काही चिरंतन आदर्श मानल्या गेलेल्या मैत्रीवर एक द़ृष्टिक्षेप टाकूया.

त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. ते सूर्यवंशी होते. अयोध्येचे राजकुमार होते. तत्कालीन परंपरेनुसार सगळ्या बालकांना वयाची बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुरुगृही शिक्षणासाठी पाठवलं जायचं. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात धाडण्यात आलं होतं. आश्रम व्यवस्थेत राजकुमारांबरोबरच सामान्य घरातील बालकांनाही पाठवलं जात असे. सर्वांना समान शिक्षण दिलं जायचं. श्रीरामांच्या सोबत निषाद देशाचा राजकुमार गुह हाही होता. निषाद हे आदिवासींचं राज्य होतं. राजकुमार गुह याच्याशी श्रीरामांचं चांगलं मैत्र जमलं. श्रीरामांच्या राज्याभिषेकाला गुहला खास निमंत्रण होतं. पण कैकयीच्या हट्टामुळं श्रीरामांना वनवासात जावं लागलं. राज्याभिषेक सोहळ्याचा बोजवारा उडाला. ‘जेथे राघव तेथे सीता’ असे म्हणत सीतामाई आणि त्यांच्याबरोबर भ्राता लक्ष्मणही वनवास पत्करून निघाले. गंगा नदीच्या काठी हे तिघेजण आले. तिथं निषाद राज्याचा राजा गुह याने स्वागत केले. श्रीराम पितृवचनासाठी आपल्या राज्याचा त्याग करून वनवासाला निघालेले आहेत हे समजताच त्याने श्रीरामांना वंदन करून आपले राज्य त्यांच्या चरणी अर्पण करून राज्याचे राजेपण स्वीकारण्याची विनंती केली. पण पितृवचनात बांधले गेल्यामुळे श्रीरामांनी गुहच्या निषाद राज्याचे राजेपण नम्रपणे नाकारले. वनवास संपवून सीता आणि लक्ष्मणासहित श्रीराम परत अयोध्येला आले, तेव्हाही त्यांना नौकेतून ऐलतीराला आणायला गुह राजा नम्रपणे उभा होता.

संबंधित बातम्या

श्रीरामांच्या राज्याभिषेकाला तो उपस्थित राहिला. श्रीराम वनवासात असताना रावणानं सीतेचं हरण केलं. तेव्हा सीतेच्या शोधार्थ भटकत असताना श्रीराम-लक्ष्मण यांना पहिल्यांदा भेटला तो हनुमान. जो आधी श्रीरामांचा सखा आणि नंतर परमभक्त झाला. त्यानंतर त्यानं आपला राजा सुग्रीव याच्याशी श्रीरामांची भेट घडवून आणली; त्या वेळी सुग्रीवाची पत्नी तारामतीला त्याचा सख्खा भाऊ वाली यानं पळवून नेऊन त्याचं राज्यही हडप केलं होतं. वाली हा सुग्रीवापेक्षा बलशाली आणि पराक्रमी होता, म्हणून सुग्रीव त्याचा पराभव करू शकत नव्हता. त्या कामी त्यानं श्रीरामाचं सहकार्य मागितलं. श्रीरामानं वालीला मारायचं आणि सुग्रीवानं सीतेच्या शोधासाठी वानरसेना द्यायची, असा मैत्रीपूर्ण करार त्यांच्यात झाला.

सहकार्याच्या देवाणघेवाणीतून झालेली ही मैत्री पुढे अकृत्रिम जिव्हाळ्यात परिवर्तित झाली. हे होण्यास कारणीभूत ठरला तो श्रीरामांचा परमभक्त श्रीहनुमान! श्रीरामांनी वालीला मारून सुग्रीवाला त्याची पत्नी परत मिळवून दिली. त्याला पुन्हा राज्यावर बसवलं. त्यानंतर वानरसेनेसह सुग्रीव स्वतः श्रीराम आणि लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधासाठी दक्षिणेकडे चालू लागला. नंतर हनुमानानं सीतामाईचा शोध घेतला. वानरसेनेनं समुद्रावर रामसेतू बांधून लंकेत प्रवेश केला. श्रीराम येऊन पोहोचल्यावर रावणाचा सद्वर्तनी आणि सभ्य बंधू बिभीषण हा श्रीरामाचा मित्र बनला. राम-रावण युद्धात रावणाचा मृत्यू कशामुळं होईल, याचं रहस्य बिभीषणानं श्रीरामांना सांगितलं. बरोबर त्याच मर्मस्थानी बाण मारून श्रीरामांनी रावणाला मारलं. सीतेला सोडवलं. नंतर लंकेच्या सिंहासनावर बिभीषणाला बसवलं. त्यानंतर ही मैत्री अखंडित राहिली. हनुमानाने तर श्रीरामांच्या सोबतच अयोध्येला वास्तव्य केलं. श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हाही त्यांनी निषादराज गुह याला खास निमंत्रित केले होते.

द्वापार युगात श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कारावासात तो वसुदेव-देवकीच्या पोटी जन्माला आला. पण नंतर त्याचं पालनपोषण नंद-यशोदेनं केलं. पुढे श्रीकृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमात एक सामान्य शिष्य म्हणून राहिला. तिथले त्याचे परममित्र म्हणजे बोबडा पेंद्या आणि दरिद्री सुदामा! नंतर श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला; तेव्हा श्रीकृष्णाला एकदा जाऊन भेटावं अशी इच्छा सुदाम्याच्या मनात निर्माण झाली. घरात श्रीकृष्णाला देण्यासारखं काहीही नव्हतं म्हणून सुदामा श्रीकृष्णाला पुरचंडीभर पोहे घेऊन भेटायला गेला. श्रीकृष्णानं अतीव प्रे्रमानं ते पोहे सुदाम्यासमोरच अक्षरशः बकाबका खाल्ले. सुदाम्याचा ऊर भरून आला. श्रीकृष्णानं त्याचं दारिद्य्र नष्ट करून त्याला अपार वैभव प्रदान केलं. ही कथा पुढे अजरामर झाली. ही कथा ‘सुदाम्याचे पोहे’ म्हणून एक चिरंतन वाक्प्रचार ठरली. तसेच पेंद्याशी असलेली मैत्रीही श्रीकृष्णानं जीवापाड जपली. राधा ही श्रीकृष्णाची मैत्रीण नव्हती, प्रेयसी तर मुळीच नव्हती, ती त्याच्याहून वयाने मोठी होती, त्याचे दिव्यत्व ओळखलेली त्याची परमभक्त होती. पुढील काळात श्रीकृष्णाचा परमसखा बनला तो अर्जुन! अर्जुनाविषयी त्याला अतिशय ममत्व होतं. त्यानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता कथन करून ज्ञान दिले. हीच भगवद्गीता हिंदूंचा पूजनीय ग्रंथ आहे.

आता आपण पुढे अकराव्या शतकातील भारतीय इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकूया. पृथ्वीराज चौहान हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय नाव आहे. ते अखेरचे हिंदू राजा होते. त्यांच्या कू्रर हत्येनंतर मुहम्मद शहाबुद्दीन घोरीनं भारतात आपल्या राजवटीची स्थापना केली. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या अकराव्या वर्षी दिल्ली आणि अजमेरचे राज्य सांभाळलं. त्यांचं राज्य दूरदूरच्या सीमांपर्यंत विस्तारलेलं होतं. ते कुशल आणि पराक्रमी योद्धे होते. महाभारत काळात अर्जुनाला जी शब्दवेधी नेमबाजी अवगत होती, तीच पृथ्वीराज चौहान यांनाही अवगत होती. आवाजाच्या दिशेनं अचूक बाण मारून लक्ष्याचा वेध घेण्याची ती विद्या होती. अशा पराक्रमी पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकहाणी इतिहासात गाजलेली आहे.

पृथ्वीराज यांचा परममित्र होता चंद बरदाई! हा चंद बरदाई पृथ्वीराजाचा दरबारी कवी होता. पृथ्वीराज रासो या बृहत्काव्याचा कवी म्हणून चंद बरदाई प्रसिद्ध आहे. पृथ्वीराजाचा व चंद कवीचा जन्म एकाच दिवशी झाला आणि मृत्यूही एकाच दिवशी, एकाच वेळी झाला. पृथ्वीराज चौहानानं घोरीचा अनेक युद्धांमध्ये पराभव केला होता. इतकेच नव्हे, तर अनेक वेळा घोरीला प्राणांचे अभय देऊन सोडून दिले होते. संयोगिता ही राजपूत राजा जयचंद्र याची कन्या होती. तिला पृथ्वीराज चौहानानं पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्यामुळं जयचंद्र चिडून होता. मुहम्मद शहाबुद्दीन घोरी पृथ्वीराजांवर चालून आला असता जयचंद्र घोरीला आपल्या सैन्यासह जाऊन मिळाला आणि घोरीनं कपटानं पृथ्वीराजास कैद केलं. ह्याच पृथ्वीराजानं आपल्याला अनेकदा अभय देऊन सोडून दिले होते, हे विसरून घोरीनं बंदीवासात असलेल्या पृथ्वीराजाच्या डोळ्यात तप्त सळ्या खुपसून त्याला अंध केले. ही गोष्ट चंद बरदाईच्या मनाला लागून राहिली.

घोरीचा सूड कसा उगवता येईल याचा विचार करून त्यानं एक योजना आखली. ही योजना त्याला मृत्युमुखात ढकलणारी होती; पण मित्रप्रेमापोटी प्राणत्यागही करण्याची त्याची तयारी होती. तो घोरीला जाऊन भेटला. आपले स्वामी पृथ्वीराज चौहान हे शब्दवेधी धनुर्विद्येत कुशल असून आपण तो प्रयोग एकदा अवश्य पाहावा, अशी विनंती केली. आपल्या भर दरबारात एकटा पृथ्वीराज आपलं काय बिघडवणार आहे, असं घोरीला वाटलं. त्यानं दरबार भरवला. पृथ्वीराजांना मोकळं सोडण्यात आलं. त्यांच्या हातात धनुष्यबाण देण्यात आलं. मोहम्मद शहाबुद्दीन घोरी याला चंद बरदाईनं विनंती केली, जहांपनाह, आमच्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी, असं बादशहाला सांगून त्यानं पृथ्वीराज चौैहान यांना इशारा दिला. बादशहा बसलेलं ठिकाण सांगितलं…

चार बाँस चौबीस गज, अंगुल अष्ट प्रमान!
ता ऊपर सुल्तान है, मत चूके चौहान!!

तेवढ्यात बादशहानं बाण सोडण्याची आज्ञा दिली. सेवकांना खुणेची घंटा वाजवायला सांगितलं. पण पृथ्वीराजानं घोरीचा आवाज अचूक टिपला होता. त्यांनी अचूक वेध घेऊन बाण सोडला. बाणानं आपलं काम चोख बजावलं. बादशहाची छाती फोडली. घोरी जागीच ठार झाला. नंतर भर दरबारात पृथ्वीराज आणि चंद बरदाईची हत्या करण्यात आली. अशी ही राजाची आणि कवीची गाढ मैत्री.

आता आपण सोळाव्या शतकात येऊ. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातलं उमरठ हे जेमतेम हजार लोकवस्तीचं गाव. ह्या गावचे सुभेदार तानाजी मालुसरे यांना मिसरूडही फुटली नव्हती, तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ बाल शिवबासह आपल्या जहागिरीत आल्या. मोजके सरदार आणि सैनिक सोबत होते. बाल शिवाजीराजे यांची जडणघडण जिजाऊ करत होत्या, ही जडणघडण होती स्वराज्यनिर्मितीची! याच वेळी शिवाजीराजे आणि तानाजी मालुसरे यांची जीवाभावाची मैत्री जमली. स्वराज्याची सेना उभी करण्यात तानाजीची महत्त्वाची भूमिका होती. सैन्य गोळा करणं, त्यांना लढाईचं प्रशिक्षण देणं यात जिजाऊ, शिवाजीराजे यांच्याबरोबरच तानाजी मालुसरे अग्रेसर होते. अशी शिवाजी आणि तानाजी यांची मैत्री फुलत होती.

दोघांनी स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेतला होता. रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेताना राजांच्या बरोबर तानाजीही होते. दोघांचाही संसार सुरू झाला. एके दिवशी आपला मुलगा रायबा याच्या विवाहाचं आवातणं द्यायला तानाजी मालुसरे राजांकडे आले. तेव्हाच बोलता बोलता जिजाऊंनी दूरवर दिसणार्‍या कोंढाणा किल्ल्याकडे बोट दाखवून तो स्वराज्यात नसल्याची खंत बोलून दाखवली. तानाजीरावांनी तिथल्या तिथं ‘आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेतली. आणि ते सैन्य घेऊन कोंडाण्यावर चालून गेले. तिथं उदयभानाशी निकराची झुंज होऊन नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. आपल्या जिवलग मित्रासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या ह्या नरवीराला मानाचा मुजरा करायलाच हवा!

जशी पृथ्वीराज आणि चंद बरदाई यांची कथा आहे, तशीच छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांची आहे. औरंगजेबाच्या सैन्याशी संभाजी महाराजांनी कडवी झुंज दिली. कवी कलश हा त्यांचा परममित्र होता. ते लेखणी इतकीच तलवारही कौशल्यानं चालवत असत. लढता लढता हे दोघे, संगमेश्वर-नावडी या गावी आले. कवी कलश हे सावलीसारखे संभाजी महाराजांच्या सोबत असायचे. याच गावात संभाजीराजांना गाफील ठेवून फितुरांनी कावा केला. स्वराज्य गिळण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या सरदारांनी दोघांनाही पकडलं. पुढे वढू बुद्रुक या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबानं संभाजीराजांची हाल हाल करून हत्या केली, त्याच वेळी कवी कलशाचीही तितक्याच निर्घृणपणे हत्या केली. मैत्रीपुढे असह्य वेदनांची आणि मृत्यूचीही तमा कलशानं बाळगली नाही. महापराक्रमी संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या तेजस्वी मैत्रीची ही तेजस्वी गाथा!

Back to top button