उत्तम नागरिक घडविणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण | पुढारी

उत्तम नागरिक घडविणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण

प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन

केंद्र शासनाने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थात्मक परिवर्तनाचीही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्ञान, कौशल्ये, प्रवृत्ती आणि मूल्ये हे उच्च शिक्षणाचे चार आयाम आहेत. यांची रुजवण घालणारे विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, रोजगाराभिमुखता वृद्धी याबरोबरच एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षण कसे उपयुक्तठरेल याचा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.

शिक्षणातून समाजपरिवर्तन हे उद्दिष्ट ठेवून शिक्षण क्षेत्राची वाटचाल आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्वंकष व्यक्तिमत्त्व विकासातून एक उत्तम नागरिक घडविणे अपेक्षित आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिक्षणासंदर्भात विविध आयोग व समित्या नेमल्या गेल्या. त्यांनी महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आणि त्यातून अनेक शैक्षणिक धोरणे राबविली गेली. आपल्या देशातील शिक्षण क्षेत्राचा विकास झाला. उच्च शिक्षणाचा विचार करता एका विशिष्ट ध्येयाने काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट घेऊन हे धोरण सादर करण्यात आले. सुरुवातीला डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने 2019 मध्ये दिलेल्या अहवालावर हे धोरण आधारित आहे. बहुविद्याशाखीय व सम्यक द़ृष्टिकोन ठेवून शिक्षण संस्था व अभ्यासक्रमांची रचना करणे, शिक्षण विद्यार्थीकेंद्रित होण्यासाठी विद्यार्थ्याला विषयांची लवचिकता आणि अध्ययनासाठी गतिशीलता उपलब्ध करून देणे ही या धोरणाची उद्दिष्टे आहेत.

विद्यार्थ्याला गतिशीलता : अकादमीक श्रेयांक अधिकोष (Academic Bank of Credit – ABC) ही अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांक साठवणूक करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विकसित करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली आहे. ही प्रणाली नॅशनल अ‍ॅकॅडेमिक डिपॉझिटोरीच्या माध्यमातून संचलित करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर एबीसीवर खाते उघडणे व त्याचा एबीसी आयडी त्याने महाविद्यालयाला / विद्यापीठाला देणे आवश्यक आहे. एबीसीवर नोंदणीकृत असलेली उच्च शिक्षण संस्था (महाविद्यालय/ विद्यापीठ) त्या विद्यार्थ्याचे श्रेयांक त्याच्या खात्यावर जमा करेल.

राष्ट्रीय प्रणाली असल्यामुळे देशातील विविध संस्थांमधून श्रेयांक मिळवण्याची मुभा त्याला मिळू शकेल. उदा. एक विद्यार्थी एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे. त्याने दोन श्रेयांकांचा एक कोर्स आय.आय.टी.मधून केला व दुसर्‍या सत्रात दोन श्रेयांकांचा एक कोर्स आय.आय.एम.मधून पूर्ण केला किंवा स्वयम (SWAYAM²) या पोर्टलवरील कोर्स पूर्ण केला तर विद्यापीठ, आय.आय.टी., आय.आय.एम. आणि स्वयम त्याचे श्रेयांक त्याच्या खात्यावर जमा करतील. पदवी देणारी संस्था हे सर्व श्रेयांक एकत्रित विचारात घेऊन पदवी प्रदान करू शकेल. विविध ठिकाणच्या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात भर पडेल. सर्वंकष व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी व रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याचे ठिकाण बदलल्यामुळे अभ्यासक्रम खंडित होणार नाही. उदा. एखाद्या विद्यार्थिनीने पदवीची दोन वर्षे शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात पूर्ण केली आणि तिला दिल्लीला नोकरी मिळाली तर तिचे तिसर्‍या वर्षाचे शिक्षण तिला तेथील संस्थेतून पूर्ण करता येईल. 50 टक्केपेक्षा जास्त श्रेयांक ज्या संस्थेतून मिळालेले आहेत ती संस्था शिवाजी विद्यापीठ तिला पदवी प्रदान करू शकेल. तसेच एखाद्या विद्यार्थ्याने पहिले वर्ष बंगळूरला पूर्ण केले आहे आणि त्याच्या पालकांची बदली झाल्यामुळे तो राहायला कोल्हापूरला स्थलांतरित झाला तर तो पुढील शिक्षण येथील महाविद्यालयातून घेईल. त्याला पुन्हा पहिल्या वर्षापासून प्रवेश घ्यावा लागणार नाही.

कोल्हापूरमधील कोणत्याही महाविद्यालयात तो दुसर्‍या वर्षात प्रवेश घेऊ शकेल आणि आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकेल. बंगळूरमधील महाविद्यालयाचे पहिल्या वर्षाचे श्रेयांक व त्यानंतरचे या विद्यापीठातील श्रेयांक विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठ त्याला पदवी प्रदान करू शकेल. एबीसी खात्यावर कमाल सात वर्षांपर्यंत त्याचे श्रेयांक वैध राहतील. याचाच अर्थ त्याने सात वर्षांत पदवी पूर्ण केली पाहिजे. तो कालावधी अमर्यादित असणार नाही.

संस्थात्मक परिवर्तनाची नांदी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाने पारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर अहवाल विचारात घेतल्यास हे धोरण संस्थात्मक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. 2035 नंतर महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात येऊन पदवी प्रदान करणार्‍या स्वायत्त महाविद्यालयात त्यांचे रूपांतर होईल. उच्च शिक्षण संस्थांचे संस्थात्मक परिवर्तन विविध प्रकारे या धोरणातून प्रतिबिंबित झाले आहे. संशोधन लक्षकेंद्रित विद्यापीठे (Research Intensive University), अध्यापन लक्षकेंद्रित विद्यापीठे (Teaching Intensive University) आणि पदवी प्रदाता स्वायत्त महाविद्यालये (Degree -warding Autonomous Colleges) असे प्रकार अस्तित्वात येतील. उत्तम गुणवत्ता असलेली महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत व पुढे आणखीही होतील. काही स्वायत्त महाविद्यालयांना संयुक्त पदवी प्रदाता दर्जा देण्यात आला आहे व ही प्रक्रिया पुढे सुरू राहील. त्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे पदवी प्रदाता स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विद्यापीठाऐवजी ते स्वतःची पदवी विद्यार्थ्यांना देण्यास सक्षम होतील. दुसर्‍या बाजूला एखाद्या शिक्षण संस्थेची काही महाविद्यालये विविध विद्या शाखांमध्ये कार्यरत असतील. तर अशा महाविद्यालयांना जोडून समूह विद्यापीठाची स्थापना करता येईल. सातार्‍याच्या रयत शिक्षण संस्थेच्या तीन महाविद्यालयांना जोडून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना झाली आहे. हे समूह विद्यापीठाचे उदाहरण होय. बहुविद्याशाखीय गुणवान स्वायत्त महाविद्यालयांस एकल विद्यापीठ बनता येऊ शकेल. तसेच काही इतर महाविद्यालयांना राज्य विद्यापीठाचे/समूह विद्यापीठाचे घटक महाविद्यालय (Constituent College) बनत येईल. संस्थात्मक परिवर्तनाचीही प्रक्रिया सुरू झालेली आहे. भविष्याचा वेध घेऊन चिरंतन टिकून राहण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला आपली रणनीती आखावी लागेल आणि त्याप्रमाणे नियोजन करावे लागेल. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने संस्थात्मक विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

पदवीची लवचिकता : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाचा आराखडा चार वर्षाचा असणार आहे. तथापि त्यामध्ये लवचिकता असणार आहे. एकाधिक प्रवेश व एकाधिकनिकास (Multiple Entry Multiple Exit) ची सोय या आराखड्यात असणार आहे. काही कारणास्तव विद्यार्थ्याला एक किंवा दोन वर्षानंतर शिक्षण सोडावे लागले तर ती त्याची वर्षे वाया जाणार नाहीत. त्यासाठी निकास घेऊन त्याला प्रमाणपत्र किंवा पदविका मिळवता येईल आणि एक किंवा दोन वर्षाच्या अंतरावर चंचुप्रवेश (Lateral Entry) करता येईल. 0 ते 4 हे विविध स्तर शालेय शिक्षण व्यवस्थेत असतील. पदवीच्या प्रथम वर्षाचा स्तर 4.5 असणार असून श्रेयांक 40 ते 44 असणार आहेत. प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर विद्यार्थी बाहेर पडणार असेल तर त्याला व्यवसायाभिमुख उन्हाळी प्रशिक्षण 4 श्रेयांकाचे घेऊन पदवीपूर्व प्रमाणपत्र (Undergraduate Certificate) मिळेल. पदवीच्या द्वितीय वर्षाचा स्तर 5.0 असून 40 ते 44 श्रेयांक असणार आहेत. द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर विद्यार्थी बाहेर पडणार असेल तर त्याला व्यवसायाभिमुख उन्हाळी प्रशिक्षण 4 श्रेयांकाचे घेऊन पदवीपूर्व पदविका (Undergraduate Certificate) मिळेल. पदवीच्या तृतीय वर्षाचा स्तर 5.5 असून 40 ते 44 श्रेयांक असणार आहेत. तृतीय वर्ष पूर्ण केल्यानंतर नेहमीप्रमाणे जर विद्यार्थी बाहेर पडणार असेल तर त्यास पदवी (Undergraduate Degree) मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना पदवीच्या चौथ्या वर्षात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना पदवीच्या (स्तर 4.5 ते 5.5) तीन वर्षांचे मिळून सीजीपीए 7.5 किंवा 75 टक्केपेक्षा जास्त गुण असले पाहिजेत. पदवीच्या चतुर्थ वर्षाचा स्तर 6.0 असून 40 ते 44 श्रेयांक असणार आहेत. चार वर्षांचा अभ्यासक्रम ‘ऑनर्स’ पदवी किंवा ‘ऑनर्स विथ रिसर्च’ पदवी असा दोन प्रकारचा असू शकेल. ऑनर्स पदवीमध्ये मुख्य विषयाच्या अभ्यासावर भर असेल तर ऑनर्स विथ रिसर्च पदवीमध्ये संशोधनावर भर असेल. चार वर्षांची पदवी पूर्ण करणारा विद्यार्थी पदव्युत्तर पदवीच्या (Postgraduation) दुसर्‍या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र असेल तर चार वर्षाची ऑनर्स विथ रिसर्च ही पदवी 7.5 सीजीपीए किंवा 75 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेला विद्यार्थी पीएचडी प्रवेशास पात्र असेल. पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाचा स्तर 6.0 असून 40 ते 44 श्रेयांक असणार आहेत आणि द्वितीय वर्षाचा स्तर 6.5 असून 40 ते 44 श्रेयांक असतील. द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडणार असेल तर पदव्युत्तर पदविका (Postgraduate Diploma) मिळेल. तीन वर्षाची पदवी पूर्ण केलेला विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यास पात्र असेल. तसेच चार वर्षाची पदवी पूर्ण केलेला विद्यार्थी पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षात चंचुप्रवेशास (Lateral Entry) पात्र असेल.

बहुविद्याशाखीय व सर्वंकष द़ृष्टिकोन : उच्च शिक्षणातील पदवीचे स्वरूप हे बहुविद्याशाखीय व्हावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास घडविता यावा यासाठी पदवी आराखड्याची रचनाकरीत असताना विविध विषयांचे प्रवर्ग समाविष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मुख्य विषय (Major), उपविषय (Minor), मुक्त विकल्प (Open Elective), कौशल्यवृद्धी (Skill Enhancement), व्यावसायिक कौशल्य (Vocational Skill), क्षमतावृद्धी (Ability Enhancement), भारतीय ज्ञानप्रणाली (Indian Knowledge System), मूल्यशिक्षण (Value Education), सह-अभ्यासक्रम उपक्रम (Co-curricular Activities), प्रत्यक्षकामाचे प्रशिक्षण (On Job Training – OJT), तसेच सामुदायिक व्यस्तता कार्यक्रम (Community Engagement Programme) अशा विविध विषय प्रवर्गांचा समावेश असेल. श्रेयांक प्रणालीप्रमाणे त्याचे श्रेयांक मूल्यांकन व मूल्यमापन केले जाईल. विद्यार्थ्याच्या सर्वंकष विकासात ज्या ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत, त्या सर्वांचा समावेश श्रेयांक प्रणालीत असेल. उदा. राष्ट्रीय सेवायोजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC), क्रीडा (Sports) व सांस्कृतिक (Cultural) उपक्रमांचा समावेश सह-अभ्यास उपक्रमांमध्ये करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील सर्व उपक्रम व विषयांचे श्रेयांक प्रणालीत मूल्यांकन केलेच पाहिजे असे अपेक्षित आहे.

अध्यापन अध्ययन प्रक्रियेची गुणवत्ता : नावीन्यपूर्ण व प्रभावी अध्यापन-अध्ययन पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. तरच गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. मानसिकतेतील बदल आणि नवीन तंत्रज्ञान यांचा पुरेसा विचार करून त्या त्या विषयासाठी वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. गुणवत्तापूर्ण विद्यार्थीव्यस्तता (Student Engagement) महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी प्रशिक्षण घेणे व स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योग, व्यवसाय, सामाजिक संस्था, इत्यादींशी संवाद साधून सैद्धांतिक शिक्षण आणि प्रात्यक्षिक शिक्षण यातील दरी कमी करता येईल. तसेच अनुभवाधारीत अध्ययन (Experiential Learning) आणि सहभागी अध्ययन (Participative Learning) यावर भर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षा, मूल्यांकन व मूल्यमापन पद्धतीमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत.निष्पत्ती आधारित शिक्षण (Outcome Based Education) अपेक्षित असल्याने निष्पत्तीचे मोजमाप योग्य पद्धतीने झाले तरच रोजगाराभिमुखता वाढीच्या शक्यता निर्माण होतील.

ज्ञान, कौशल्ये, प्रवृत्ती आणि मूल्ये हे उच्च शिक्षणाचे चार आयाम आहेत. यांची रुजवण घालणारे विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि रोजगाराभिमुखतावृद्धी, याबरोबरच एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी हे शिक्षण कसे उपयुक्तठरेल हे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी जे प्रभावी योगदान द्यावयाचे आहे, त्यावरच अवलंबून राहील. शासन, विद्यापीठ, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, उद्योग, व्यवसाय, सामाजिक संस्था इत्यादी घटकांची भूमिका यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मूलभूत सोयी-सुविधा, उत्तम तज्ज्ञ शिक्षकांच्या नेमणुका, प्रभावी अध्यापन-अध्ययन, मूल्यमापनातील सुधारणा इत्यादी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येणार आहे तेच या धोरणाचे फलित असेल.
(लेखक हे उच्च शिक्षणतज्ज्ञ असून सध्या शिवाजी विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.)

Back to top button