काही ठिकाणी महापूर, पारनेरमध्ये नुसती रिमझिम ! | पुढारी

काही ठिकाणी महापूर, पारनेरमध्ये नुसती रिमझिम !

दादा भालेकर

टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर) : विदर्भासह कोकणात दमदार पाऊस पडत असून, अनेक धरणांतील विर्सगामुळे नद्या, नाल्यांना महापूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना; मात्र पारनेर तालुक्यात नुसती रिमझिम सुरू आहे. दमदार पाऊस नल्याने तालुक्यातील बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील काही ठिकाणी भीषण पूरस्थिती असल्याने जवळपास अनेक धरणे तुडूंब भरली आहेत. मोठ्या प्रमाणात धरणांतून विर्सग सोडण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुष्काळी म्हणून नकाशावर असलेला नगर जिल्हा, तसेच पारनेर तालुक्यात मात्र तब्बल तीन महिन्यात रिमझिम वगळता मोठा पाऊस झालेला नाही. आजही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली, तर अनेक जण उध्वस्थ झाली. वन्यप्राण्यांचा अंदाज लागणेही कठीण होत असताना पारनेर तालुका संपूर्ण तालुक्याची मदार असलेेले मांडओहळ मध्यम प्रकल्पासह, काळू, तिखोल, ढोकी नंबर 1, ढोकी नं.2, भांडगाव, पळशी, हंगा आदी तलाव आजही कोरडेठाक आहेत. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणे भरून नद्या दुधडी असताना पारनेर तालुक्यात मात्र आजही तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पारनेर तालुक्यामध्ये आज अखेरपर्यंत 32245 शेतकर्‍यांनी 43302 क्षेत्रावर विविध खरीप पिकांचा विमा उतरवलेला आहे. उर्वरित शेतकर्‍यांनी 31 जुलैपर्यंत आपल्या सर्व क्षेत्राचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी केले.

दुष्काळीची ओळख पुसता-पुसेना!

संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत असताना पारनेर तालुक्यात मात्र अनेक ठिकाणी खरीपाची पेरणीही झाली नसून काही भागात पिकांपुरताच पाऊस झाला आहे. एकाही तलावात नवीन पाण्याची आवक झाली नसून विहीरींनाही पाणी नसल्याने महाराष्ट्रातील जलतांडव पाहता पारनेर तालुक्यात तीव्र पाणी टंचाईच्या सावटामुळे दुष्काळी पारनेर तालुक्याची ओळख पुसता-पुसेना असेच म्हणावे लागेल.

पाऊसाने दडी मारल्याने दुग्ध व्यवसाय संकटात

पारनेर तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मुगासह कांद्याची पेरणी होत असते. मात्र, पावसाने दडी मारल्याने आज ना उद्या पाऊस पडेल याबाबत बळीराजा जीवन कंठत असून, जनावरांना चारा उपलब्ध करणे कठीण होवून बसल्याने आधिच कर्जबाजारी असलेल्या शेतकर्‍यांकडे पशुधन वाचविणे जिकरीचे बनले आहे. यामुळे दूध धंदाही अडचणीत सापडला आहे, अशी प्रतिक्रिया पंढरीनाथ गांगड यांनी दिली.

पारनेर तालुक्यात जवळपास 75 टक्के पेरणी

पारनेर तालुक्यामध्ये खरीप हंगाम आज अखेर 46 हजार 480 हेक्टर पेरणी झालेली असून, म्हजेच 75 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जून महिन्यात 46.2 मिमी., तर जुलैमध्ये 99.8 मिमी. पावसाची नोंद आहे. तृणधान्य 25952 क्षेत्रापैकी 12588, धान्य 22850 क्षेत्रापैकी 8357, गळीत 1573 क्षेत्रापैकी 8114, खरीप क्षेत्र उसासह 50401पैकी 40767 पेर झाली आहे.

हेही वाचा

अहमदनगर : मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

अहमदनगर : विश्वजीत कासार टोळीला पुन्हा मोक्का

कोल्हापूर : गांजा पुरवठा करणार्‍या तस्कराचे नाव निष्पन्न; सीडीआर मागवला

Back to top button