अहमदनगर : विश्वजीत कासार टोळीला पुन्हा मोक्का | पुढारी

अहमदनगर : विश्वजीत कासार टोळीला पुन्हा मोक्का

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाकडून वैद्यकीय उपचारासाठी जामीन घेऊन फरार होत, पुन्हा खुनासह खंडणी मागण्याचे गंभीर गुन्हे केलेल्या कुख्यात गुन्हेगार विश्वजीत कासार व त्याच्या टोळीविरुद्ध पुन्हा मोक्का लावण्यात आला आहे. नगर तालुका पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्फत पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.

या टोळीचा प्रमुख विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता.नगर) याने वेगवेगळ्या साथीदारांसह 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने कासार व त्याच्या दोन साथीदारांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. तसेच, कासार व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध 2 वर्षांपूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान, कासार हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून वैद्यकीय उपचारासाठी जामीन घेऊन मुदतीनंतर परत कारागृहात हजर न होता फरार झालेला आहे. या कालावधीत त्याने साथीदारांच्या मार्फत वाळकी येथील लोखंडे कुटुंबियांना 2 लाख 70 हजारांची खंडणी मागितली. ती न दिल्याने केलेल्या मारहाणीत नाथा ठकाराम लोखंडे यांचा मृत्यू झाला. सदर गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आलेली असून, विश्वजीत कासार हा अद्याप फरार आहे.

मोक्का लावलेला असतानाही त्यांनी पुन्हा खुनासह खंडणीचा गुन्हा केला असल्याने नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्फत नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का कायद्यातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या टोळीवर पुन्हा मोक्का लावण्यात आला आहे.

हेही वाचा

अहमदनगर : तोतया पोलिस अधिकार्‍यास अटक

सिंहगड रस्ता गेला खड्ड्यात ! वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची दैना

पक्ष दुभंगला तरी नाती कायम! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांची समंजस भूमिका

Back to top button