अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस; शेतकर्‍यांना दिलासा | पुढारी

अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस; शेतकर्‍यांना दिलासा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : प्रदीर्घ विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार बरसात केली. दिवसभर संततधार सुरू होती. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. सखल भागात पाणी साठल्याने पाण्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. नोकरदार व शाळकरी मुलांची त्रेधातिरपीट उडाली.

जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकर्‍यांना गुरूवारच्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. बुधवारी रात्रीपासूनच नगर शहरासह जिल्ह्यात रिमझिम सुरू होती. गुरूवारी सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत होता. जोरदार पावसाने नगर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. रस्तेही पाण्यात बुडाले. रस्त्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. संततधार पावसाने नोकरदार व शाळकरी मुलांची त्रेधातिरपीट उडाली.

जिल्ह्यात सर्वदूर प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाऊस पडला. या पावसाने शेतपिकांना संजीवनी मिळाली. पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी पेरणी केली, मात्र पावसाने दडी मारली. शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे असतानाच गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावत दिलासा दिला. जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण पाणलोटात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणातून विर्सगही सोडण्यात आला आहे.

हेही वाचा

शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा

जवळ्यात दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण; पती गंभीर जखमी

तिसगावमध्ये सरकारी जागेत बसून मावाविक्री

Back to top button