तिसगावमध्ये सरकारी जागेत बसून मावाविक्री | पुढारी

तिसगावमध्ये सरकारी जागेत बसून मावाविक्री

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मावा, गुटख्याची खुलेआम विक्री केली जात आहे. चौकाचौकात मावा, गुटख्याच्या टपर्‍या सुरू आहेत. वृद्धेश्वर चौकासह शासकीय विश्रामगृहाजवळील शासकीय जागेत मावा गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. या मावा विक्रीला कोणाचा छुपा आशीर्वाद आहे, सा सवाल विचारला जात आहे.

तिसगाव येथे बाहेरगावहून येणार्‍या विद्यार्थिनींची वृद्धेश्वर चौकासह परिसरामध्ये टवाळखोर तरूणांकडून छेड काढली जात आहे. याबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्यानंतर राजकीय नेते मंडळींसह पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. वृद्धेश्वर चौकातील दोन-तीन मावा विकणार्‍या टपरी चालकांवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. मात्र, तिसगावच्या शासकीय गेस्ट हाऊस कार्यालयाजवळ, तसेच इतर काही ठिकाणी खुलेआमपणे मावा, गुटखा विक्री सुरू आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांची डोळेझाक होत आहे.

तिसगावमधील मावा नगर, पुणे, मुंबईपर्यंत पाठविला जातो. या मावा विक्रीतून लाखोंची कमाई केली जात असून, मावा तयार करण्यासाठी लाखो रूपये किमतीच्या मशिनरीही तिसगावमध्ये आणलेल्या आहेत. त्यामुळे मावा विक्रीची ही व्याप्ती किती मोठी असेल, हे स्पष्ट होत आहे. मंगळवारी वृद्धेश्वर चौकातील दोन मावा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, धनधांडगे मावा, गुटखा विक्रेते या कारवाईतून सुटतात कसे? त्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अवैध धंदे बंद करा

तिसगावमधील सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी मटका, जुगार, चक्री, मावा, गुटखा विक्री पूर्णपणे बंद केली पाहिजे. काही टवाळखोर तरूणांमुळेच तिसगावची शांतता बिघडत आहे. यास येथील अवैध धंदेच कारणीभूत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ते पूर्णपणे बंद करावेत, अशी मागणी माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी केली आहे.

हेही वाचा

कोपरगाव : अधिक मासामुळे चांदी खातेय भाव..! प्रति किलो 5 हजारांची वाढ

शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा

नेवासा : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

Back to top button