जवळ्यात दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण; पती गंभीर जखमी

जवळ्यात दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण; पती गंभीर जखमी

जवळा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा येथे दरोडेखोरांनी पती- पत्नीला शस्त्राने मारहाण करीत लाखाचा ऐवज लुटून नेला. यामध्ये पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.26) रात्री एकच्या दरम्यान घडली. शिरूर-जवळा या राष्ट्रीय मार्गावरील हॉटेल तारांगणचे मालक संपत विठ्ठल सालके यांचा मुलगा प्रवीण संपत सालके (वय 28) व सून प्राजक्ता प्रवीण सालके (वय 25) हे आपली नेहमीची हॉटेलची व शेतीची कामे करून शेतातील घरात झोपले होते. बुधवारी रात्री एकच्या सुमारास चार चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. प्रवीण सालके यांना डोक्यात व चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

त्यांची पत्नी प्राजक्ता यांनाही मारहाण करत त्यांच्या कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. घरात सर्वत्र उचकपाचक केली. अशा परिस्थितीतही दोघा पती-पत्नीने चोरट्यांच्या तावडीतून आपली सुटका करत, शेजारी राहणार्‍या चुलत्यांच्या घरी धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु, चोरट्यांनी त्यांचा दरवाजा बाहेरून लावला असल्याने त्यांना पटकन बाहेर पडता आले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी हाती मिळेल ते घेऊन पलायन केले. चोरट्यांच्या मारहाणीत प्रवीण यास डोक्याला गंभीर जखमा झाल्याने ते नंतर बेशुद्ध पडले. दोघा पती-पत्नीस उपचारासाठी शिरूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळतात पारनेरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे बारकाईने पाहणी करून त्यांनी तपासाच्या दृष्टीने सूत्रे फिरविली आहेत.

दरोडा की जुन्या वादातून वचपा?

ही घटना नक्की दरोडा आहे की, जुन्या कौटुंबिक वादातून राग काढत दरोड्याचा बनाव करत वचपा काढण्याचे काम झाले असल्याची चर्चा ही परिसरात ऐकण्यास मिळत आहे. वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आरोपींना लवकरच जेरबंद करू

पारनेर तालुक्याचा विस्तार मोठा असून, डोंगरी भाग दर्‍याखोर्‍यांचा, लांब पल्ल्याचा असल्याने रात्री मदत मिळण्यात विलंब होतो. या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच जेरबंद करू. ग्रामस्थांनी स्वसंरक्षणार्थ सतर्क राहून तपासकामी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news