नेवासा : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! | पुढारी

नेवासा : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. शहराध्यक्षाला आता तालुकाध्यक्ष करण्याची मागणीच कार्यकर्त्यांनी केल्याने अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. उघडपणे विरोध न दाखवता एकमेकांना सावध भूमिका घेत पदोन्नती देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान,तालुक्यात काँग्रेसची ताकद कमकुवत असताना अंतर्गत वादाने घेरल्याने वेगवेगळ्या चर्चा झडत एकमेकांवर नाराजीचे खापर फोडले जात असण्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षकांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला विश्वासात घेतले नसल्याची चर्चा सुरू आहे. परस्पर शहराध्यक्ष नियुक्ती झाल्याने काँग्रेस अंतर्गत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी चार वर्षे पदावर कामकाज केल्याने त्यांनाच आता पदोन्नती देऊन जिल्हास्तरावर संधी द्यावी व नेवाशातील शहराध्यक्षांना तालुकास्तरावर बढती देऊन तालुकाध्यक्ष करण्याची लेखी मागणीच स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांनी श्रेष्ठींकडे केल्याने खळबळ उडाली आहे.

नेवासा नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व तालुक्यातील काही मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकांच्या हालचाली सर्वच राजकीय पक्षांमध्ये होत असतांनाच तालुक्यातील काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अगोदरच तालुक्यावर आमदार शंकरराव गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. विविध संस्था त्यांच्या अधिपत्याखाली आहेत.

काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनीदेखील पक्षाची पाहिजे अशी राजकीय ताकद नसतांना वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलने केली आहेत. लोकांचा रेटा त्यांच्याबरोबर कमी असताना शहरातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असला, तरी आता तालुकाध्यक्षांच्या विरोधातच एकप्रकारे बंड करून शहराध्यक्षांना तालुकाध्यक्ष करण्याच्या मागणीमुळे अंतर्गत धुसफूस वाढल्याचे संकेत आहेत. शहरातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फक्त तालुकाध्यक्षांना उघडपणे विरोध दाखवला नसला, तरी त्यांना जिल्हा स्तरावर जाण्याचा सल्ला वजा मागणी ही अंतर्गत धुसफूस लपून राहिलेली नाही.

कामकाजाचा हिशेब थोरांतापुढे मांडणार

शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी नव्या, जुन्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीसंदर्भात तसेच तालुक्यातील कामकाजाचा हिशेब श्रेष्ठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कथन करणार असल्याचे एका पदाधिकार्‍याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा

संगमनेर : गायरान जमीन मोजणीस शेतकर्‍यांचा कडाडून विरोध!

अहमदनगर जिल्ह्यातील 510 केंद्रांचे बाभळेश्वरला औपचारिक उद्घाटन

कोपरगाव : अधिक मासामुळे चांदी खातेय भाव..! प्रति किलो 5 हजारांची वाढ

Back to top button