कोपरगाव : अधिक मासामुळे चांदी खातेय भाव..! प्रति किलो 5 हजारांची वाढ | पुढारी

कोपरगाव : अधिक मासामुळे चांदी खातेय भाव..! प्रति किलो 5 हजारांची वाढ

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अधिक मास अर्थातच धोंड्याचा महिना सुरु असल्यामुळे जावयांची सासरवाडीकडे रेलचेल सुरू झाली आहे. गावोगावी लेक- जावयाचा आदर, सन्मान केला जात आहे. अधिक मासनिमित्ताने वाण म्हणून जावई व लेकीला सोने, चांदी किंवा तांबे, पितळ्याची आदी स्वरुपात भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. यानिमित्त सोने- चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी वाढत आहे.
चांदीचे दोन प्रकार आहेत. शुद्ध चांदी 77 हजार रुपये किलो तर कोल्हापुरी चांदी 70 हजार रुपये किलो असा सध्या भाव आहे. चांदीच्या दरात 1 किलोसाठी तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

अधिक, श्रावण मासात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. प्रामुख्याने ताट, दिवा, समई, निरंजन, जोडवे, मेखला, छल्ला, पायल, वाटी, ग्लास, चमचा या वस्तूंचा यात समावेश आहे. जोडव्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे सोने- चांदीचे पिढीजात व्यावसायिक चंदूकाका उदावंत यांनी सांगितले.

श्रावण व अधिक मास म्हटला की, व्रत, वैकल्य, धार्मिक पुजनाचा उत्सव सुरु असतो. 33 अनारसे व बत्तासे देण्याचा प्रघात आहे. मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाजारपेठेत कपड्यांसह छोट्या-मोठ्या वस्तूंच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. श्रावणात नागपंचमी, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी आदी सणोत्सव असतात. नागपंचमीला माहेरची मंडळी लाडक्या लेकीला नवीन चांदीचे जोडवे घेते तर राखी पौर्णिमेला लाडक्या भाऊरायाला चांदीची राखी बांधण्याकडे घरोघरी महिलांचा कल वाढलेला दरवर्षी दिसतो. श्रावण महिन्यामध्ये पुजेसाठी चांदीचा गणपती, लक्ष्मी, शिवलिंग, चांदीचे पळी, ग्लास, पात्र, कलश या वस्तूंना मोठी मागणी असते, असे सागर व वैभव उदावंत यांनी ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.

जावई मंडळीवर गोड कौतुकाचा होतोय वर्षाव..!

अधिक मासात लेक – जावयाचा मानपान करण्याची परंपरा असल्याने जावयांचा भाव वधारला आहे. अधिक महिन्यामुळे सासुरवाडीहून आग्रहाचे निमंत्रण येते. गोड धोड जेवणावळीसह कपड्यांचा आहेर, चांदीचे वाण दिले जातात. यामुळे जावई मंडळी गोड कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघत आहे.

हेही ‌वाचा

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे पाणी, वाहतूक संथगतीने

संगमनेर : गायरान जमीन मोजणीस शेतकर्‍यांचा कडाडून विरोध!

दूध गुणप्रतीच्या कपात पूर्वीप्रमाणे 30 पैसेच ठेवा : सदाभाऊ खोत

Back to top button