भर पावसाळ्यात पाण्यावाचून हाल; कर्जत तालुक्यातील 32 गावांना टँकरने पाणी

भर पावसाळ्यात पाण्यावाचून हाल; कर्जत तालुक्यातील 32 गावांना टँकरने पाणी

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी, तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचे पाण्यावाचून होणारे हाल थांबविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने 32 गावांना टँकरच्या दररोज 64 खेपांद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे काही प्रमाणात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पुरेसा व दमदार पाऊस नसल्याने खरीप पेरण्या झाल्या नाहीत.

तलाव, नद्या-नाले, विहिरी कोरड्याठाकआहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये खुरंगेवाडी, देमनवाडी, चांदे बुद्रुक,मानेवाडी, लोणी मसदपूर, पिंपळवाडी, सोनारवाडी, निमगाव डाकू, करपडी, बिटकेवाडी, धालवडी, शिंदेवाडी, मुळेवाडी, बेलवंडी, कर्जत, राक्षस वाडी, बारडगाव, परीटवाडी, गायकवाडवाडी, थेटेवाडी, डिकसळ, माही, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, ताजू, भोसे या गावांचा समावेश आहे.

तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना शासनाचा एकही टँकर टंचाईग्रस्त गावांना सुरू नाही. नागरिकांचे पाण्यावाचून होणारे हाल पाहून आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने 32 गावांमध्ये रोज टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news