Good news ! खडकवासला धरण तुडुंब ; मुठा खोर्‍यासह धरण क्षेत्रात दम’धार | पुढारी

Good news ! खडकवासला धरण तुडुंब ; मुठा खोर्‍यासह धरण क्षेत्रात दम’धार

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : मुठा खोर्‍यासह धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पावसासह अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्याने खडकवासला धरण शंभर टक्के भरून वाहू लागले. त्यामुळे पुन्हा धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 20.42 टीएमसी म्हणजे 70.06 टक्के साठा झाला होता.

टेमघर धरणामध्ये 50 टक्के साठा झाला आहे, तर धरणसाखळीतील सर्वांत अधिक पाणीसाठवण क्षमतेचे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणात 67 टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण वाढले आहे. दुपारी खडकवासला शंभर टक्के भरल्याने एक वाजता 428 क्सुसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. सायंकाळी पाच वाजता 1712 क्सुसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, तर रात्री अकरा वाजता 4280 क्सुसेक पाणी सोडण्यात आले. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी दिली.

अधिकारी सतर्क
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, पानशेतचे शाखा अभियंता अनुराग मारके, वरसगावच्या शाखा अभियंता प्रतीक्षा मारके, खडकवासल्याच्या शाखा अभियंता गिरिजा फुटाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी धरणांवर सज्ज आहेत.

एक टीएमसी पाण्याची वाढ
पानशेत, वरसगाव धरणमाथ्याखाली पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, मुठा खोर्‍यासह रायगड जिल्ह्यालगतच्या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत धरणसाठ्यात जवळपास एक टीएमसी पाण्याची वाढ झाली.

सध्या असलेला पाणीसाठा
खडकवासला धरणसाखळीची क्षमता 29.15 टीएमसी आहे. धरणांतील सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये (टक्केवारी) : टेमघर 1.87 (50.39), वरसगाव 8.65 (67.46), पानशेत 7.93 (74.49), खडकवासला 1.97(100)

हेही वाचा :

सातारा : ‘बीस साल बाद’ फुटली खुनाला वाचा

सांगली जिल्ह्यात सलग 17 तास ‘जोरधार’; जनजीवन गारठले

Back to top button