संगमनेर : गायरान जमीन मोजणीस शेतकर्‍यांचा कडाडून विरोध! | पुढारी

संगमनेर : गायरान जमीन मोजणीस शेतकर्‍यांचा कडाडून विरोध!

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निमज गावात जलजीवन योजनेंतर्गत पाणी साठवण व जलशुद्धीकरण तलावासाठी अधिग्रहित केलेल्या गायरान जमीन मोजणीस गेलेल्या भूमी अभि लेखच्या अधिकार्‍यांना विरोध करीत ग्रामस्थांनी काम बंद पाडले. याबाबत प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे योजनेचे काम अधांतरी राहिले. प्रशासनाने या योजनेच्या जागेबाबत लवकर योग्य तोडगा न काढल्यास निमज ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला.

निमज गावाच्या जलजीवन योजनेंतर्गत संपूर्ण गावाला नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची महत्त्वकांक्षी योजना सरकारने सुरू केली. या योजनेसाठी सुमारे 13 कोटी 88 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतून पाण्याची टाकी, साठवण तलाव, जलशुद्धीकरण व सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस गावातील गुराचा तळ या भागातील 3 पैकी 2 हेक्टर शासकीय गायरान जमीन या योजनेस अधिग्रहित करावी, असा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून तो मंजुरीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायतीने पाठविला. नंतर सदरची शासकीय जागा या योजनेस वापरावी, असे निर्देश 12 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने जीवन प्राधिकरणसह निमज ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले होते.

योजनेसाठी अधिग्रहित केलेल्या जागेची शासकीय मोजणी करण्यास निमज ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे 42 हजार रुपये अति तातडीची शासकीय फी भरली. नंतर दि.23 जून रोजी निमज गावातील गुराचा तळ जमिनीची मोजणी करण्यास भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आले असता, एका शेतकर्‍याने या मोजणी कामास विरोध करीत अडथळा आणला. यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून योजनेचे काम बंद झाले. या योजनेच्या कामाचा मार्ग नेमका कधी मोकळा होतो, याकडे निमज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप..!

संगमनेर तालुक्यातील निमज गावात जलजीवन योजनेच्या जागेच्या अडचणीबाबत ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी प्रशासनाशी पत्र व्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून चर्चा केली, मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप निमज ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा

राहुरी : सहा जणांकडून तरूणास मारहाण; गुन्हा दाखल

सोलापूार : वळसंगमध्ये सराफी दुकान फोडले; ६६ तोळे सोन्याचे आणि २६ किलो चांदीचे दागिने लंपास

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे पाणी, वाहतूक संथगतीने

Back to top button