पाथर्डी : पावसाने विजयनगर रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमध्ये साठले पाणी | पुढारी

पाथर्डी : पावसाने विजयनगर रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमध्ये साठले पाणी

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वाट शोधू कुठे? या म्हणीप्रमाणे शहरातील विजयनगरच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विजयनगरचा रहदारीचा रस्ता जलमय झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मंगळवारच्या पावसाने खड्ड्यांत पाण्याचे डबके तयार झाले आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर रस्त्यावरून येणारा प्रत्येकजण विजयनगरच्या मुख्य रस्त्याने आनंदनगर, तसेच मुंडेनगरमार्गे शेवगाव रस्त्याकडे जाण्याकरिता या रस्त्याचा वापर करतो. शाळा, विद्यालय, कॉलेज, तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याककडे, नगरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आनंदनगर, विजयनगर व शेवगाव रस्त्यावरून येणार्‍या नागरिकांची या रस्त्यावरून दिवसभर वर्दळ असते.

विद्यार्थ्यांना डबक्यातून पायी किंवा सायकलद्वारे जावा लागते. त्यावेळी चिखल आणि घाण पाणी अंगावर उडतो. याच रस्त्यावरून पालकांना आपल्या मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वेळप्रसंगी छोटे-मोठे अपघातही रस्त्यावर होतात. गोरे मंगल कार्यालयापासून ते केरकर यांच्या घरापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. या पाण्यात डुकरांचाही सुळसुळाट पाहायला मिळतो. या रस्त्यावरून प्रवास करणे एक दिव्यच आहे.कधीकधी दुचाकीवरून तर विद्यार्थी सायकलवरून घसरून पडतात. पाथर्डी नगरपरिषद प्रशासन याकडे पाहायला तयार नाही. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही रस्ता होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

वाहनधारकांची कसरत

शहरात उपनगरे वाढत चालली असून, रस्त्यांची कामे काही प्रमाणात झाली आहेत. काही ठिकाणी अद्यापि रस्ते होणे बाकी आहे. विजयनगरचा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे.उन्हाळ्यात या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. आता वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.

हेही वाचा 

’निकालाच्या परीक्षे’ची पुणे विद्यापीठाकडून जय्यत तयारी

वाळकी : आ. रोहित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील सातव्या दिवशीच्या पीर-पंजाच्या भेटी उत्साही वातावरणात संपन्न

Back to top button