

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, येत्या आठवड्यात जवळपास सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचे निकाल प्रसिद्ध होतील.
विद्यापीठाच्या इतर अभ्यासक्रमांचे निकाल शक्य तितक्या लवकर प्रसिद्ध करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे कर्मचारी-अधिकारी कार्यरत असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे. राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होईल, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी; तसेच पदव्युत्तर पदवीच्या (मास्टर्स) परराज्यात आणि परदेशात जायचे असल्याने, त्यांना निकालाची आवश्यकता आहे. पुणे विद्यापीठाकडून साधारण 139 अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या आहेत.
यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे हे निकाल तातडीने जाहीर होण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर निकाल जाहीर होण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कर्मचारी आणि अधिकार्यांनी युद्धपातळीवर काम हातात घेतल्याने, हे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. प्राध्यापकांनीही उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केल्यामुळे काही अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
या अभ्यासक्रमांचे निकाल झाले जाहीर…
पुणे विद्यापीठाच्या बीए, बी-कॉम, बीबीए, बीएड, बी-आर्च, बीए-एलएलबी, बीई, एलएलएम, बीएस्सी, बीसीए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आदी मोठी विद्यार्थी संख्या असणार्या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या अभ्यासक्रमांच्या इतर वर्षांचे; तसेच मास्टर्सचे निकालही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहेत.
पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहेत. मोठी विद्यार्थी संख्या असणार्या काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीरही झाले असून, उर्वरित अभ्यासक्रमांचे येत्या आठवड्यात जाहीर होतील. हे निकाल तातडीने जाहीर होण्यासाठी कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक युद्धपातळीवर काम करीत आहेत.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
हेही वाचा :