शिर्डी : अवैध वाहनांना श्रीसाईबाबा प्रसादालयासमोर प्रतिबंध..! | पुढारी

शिर्डी : अवैध वाहनांना श्रीसाईबाबा प्रसादालयासमोर प्रतिबंध..!

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात मोठे अशी गणणा असलेल्या श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालाच्या प्रवेशद्वारासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांसह रिक्षा स्टॅन्ड हटविण्याची कारवाई श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून श्रीसाईभक्तांना वाहनांच्या होणार्‍या त्रासापासून मुक्ती मिळाल्याची शहरात चर्चा सुरु आहे. शिर्डी वाहतूक शाखेच्या या दमदार कामगिरीचे श्रीसाईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्रीसाईबाबांच्या शिर्डी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे श्रीसाईबाबांच्या दर्शनास येणार्‍या पदयात्रींना चालण्यास अडथळा निर्माण होत असे. भाविकांच्या मुलभूत सुख-सुविधांसाठी आता शहरात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास शिर्डी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. शहरात या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी या मोहिमेत सक्रिय होत कारवाईचा बडगा उचलला. या मोहिमेत वाहतूक शाखेचे स. पो. नि. सचिन जाधव,पो.हे.काँ. सूरज गायकवाड, श्रीसाईबाबा संस्थानचे अधिकारी अतुल वाघ, श्रीसाई मंदिर सुरक्षा व्यवस्थेचे कोते यांच्यासह कर्मचारी अहभागी झाले होते.

दररोज सुमारे 50 हजार भाविक श्रीसाई संस्थानच्या प्रसादालयात बाबांचा भोजन प्रसाद ग्रहण करतात. या प्रसादालयात येण्या- जाण्यासाठी प्रवेशद्वारासमोर खासगी वाहनांच्या गर्दीने भक्तांना प्रचंड त्रास होत होता. अनेक साई भक्तांनी अशी वाहने हटविण्यासाठी संस्थान प्रशासनासह पोलिसांकडे तक्रारी करूनही खासगी वाहन चालक मनमानी करीत रस्त्यावर रिक्षा, जीप, कार उभी करून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक करीत होते. अखेर श्रीसाईबाबा संस्थान व शिर्डी वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या कारवाईत वाहने व रिक्षा स्टँड हटवून 100 मीटर अंतरावर वाहनांना प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारासमोरील परिसर वाहनविरहीत झाला आहे.

दोन्ही प्रवेशद्वारांसमोरचा परिसर वाहनविरहित ठेवा

देश-विदेशातून भोजन प्रसाद घेण्यासाठी येणार्‍या भाविकांनी शिर्डी वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. दोन्ही प्रवेशद्वारासमोरचा परिसर कायमस्वरूपी वाहनविरहीत असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा

राशीन नळयोजनेच्या पाण्याची चोरी

राहुरी : तोतया अधिकारी जेरबंद ! अन्न, औषध प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी

कोल्हापूर : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Back to top button