राहुरी : तोतया अधिकारी जेरबंद ! अन्न, औषध प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी | पुढारी

राहुरी : तोतया अधिकारी जेरबंद ! अन्न, औषध प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दूध घेऊन मोटारसायकलवरुन जाणार्‍या शेतकर्‍याला रात्रीच्या दरम्यान राहुरी- सोनई रस्त्यावर अडवून त्यांची ऑनलाईन 14 हजार रूपयांची लुटमार करीत त्यांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना राहुरी- सोनई रोडवरील पिंपरी अवघड परिसरात उडली होती. या घटनेतील आरोपीला राहुरी पोलिस पथकाने सोनई येथून ताब्यात घेत गजाआड केले.

दिलीप जगन्नाथ गुंजाळ (वय 50 वर्षे) हे राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे राहतात. ते शेती व दूध व्यवसाय करतात. (दि. 18 जुलै) रोजी रात्री 8.30 वाजे दरम्यान दिलीप गुंजाळ हे त्यांच्या मोटारसायकलवरुन दूध घेऊन डेअरीकडे जात होते. दरम्यान, ते राहुरी ते सोनई जाणारे रोडने जात असताना पिंप्री अवघड शिवारात नाना पवार यांच्या विटभट्टीजवळ त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या एका भामट्याने त्यांना थांबवले. ‘मी अन्न व भेसळ प्रशासनाकडुन आलो आहे.

तुमच्या दुधात भेसळ आहे. तुम्ही नेत असलेले दूध चेक करायचे आहे,’ असे म्हणत त्या भामट्याने दुधाच्या कॅनचे झाकण उघडून दिलीप गुंजाळ यांना ढकलुन देत त्यांचा मोबाईल व आधार कार्ड हिसकावले. नंतर भामट्याने गुंजाळ यांना दमदाटी करुन त्यांच्या मोबाईलवरून दुसर्‍या एका नंबरवर फोन पे द्वारे 14 हजार रुपये टाकले. व भामट्याने गुंजाळ यांचा 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. भामट्याने गुंजाळ यांची एकूण 19 हजार रुपयांची लूटमार केली.

घटनेनंतर दिलीप गुंजाळ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे करीत होते.

तपासा दरम्यान पोलिस पथकाला आरोपीचा सुगावा लागल्याने पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलिस नाईक इफ्तीकार सय्यद, सचिन ताजणे आदींच्या पोलिस पथकाने सोनई येथे छापा टाकून या घटनेतील अजय राजेंद्र शिंदे (रा. सोनई) याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा

जोगेश्वरीत पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलची गॅलरी कोसळली; जीवितहानी नाही

शेवगाव : थेंबथेंब पावसाने पिके जेमतेम; उत्पन्नात घट होण्याची भीती

कोल्हापूर : पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Back to top button